| उरण | वार्ताहार |
न्हावा- न्हावा शेवा शिवडी सी लिंकच्या चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील प्रवेशद्वाराची पाहणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत मुंबई शहराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा येथे होते.
न्हावा-शिवडी सि-लिंक हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणून ओळखला जाणारा पुल 12 जानेवारीला लोकांसाठी खुला केला जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या पुलाच्या उद्घाटनासोबत उरण-खारकोपर रेल्वेचेही उद्घाटन करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरु आहेत. उरणच्या विकासात मैलाचा दगड ठरणार्या या दोनही प्रकल्पाची उरणची जनता आतुरतेने वाट पहात आहे.
पुलाचे 100 टक्के काम पूर्ण झाले असून रंग-रंगोटीसह अन्य रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत. मात्र, चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील शिवडी-न्हावा सी लिंकच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. अनाधिकृत कंटेनर यार्ड मालकांनी रहदारीच्या रस्त्यावर आपले बस्तान बसवले आहे. या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई शहराचे पालकमंत्री मंगळप्रभात लोढा यांनी शनिवारी या परिसरातील रस्त्यांची पाहणी केली.
न्हावा-शेवा शिवडी सी-लिंकच्या प्रवेशद्वाराची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
