| उरण | प्रतिनिधी ।
शिवडी ते न्हावा शेवा मुंबई ट्रान्सहार्बर लिंकच्या पॅकेज-1 मधील ऑर्थोटोपिक स्टील डेकचे (ओएसडी) एमएमआरडीएच्या वतीने काल यशस्वी लाँचिंग करण्यात आले. हा स्टील डेक 180 मीटर लांब आणि तब्बल 2,400 मेट्रिक टन वजनाचा असून हे वजन पाच ते सहा बोईंग विमानाच्या वजना बरोबरचे आहे. हा दुसरा ओएसडी गर्डर असून पहिला गर्डर यावर्षीच्या 1 एप्रिल रोजी बसविण्यात आला होता . शिवडी ते न्हावा शेवा मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून पुढील वर्षीच्या अखेरीस हा मार्ग सुरू होणार असून नवी मुंबईतून अवघ्या 20 मिनिटांत दक्षिण मुंबई गाठता येणार आहे.
देशातील सर्वात मोठा सागरी मार्ग ठरणाऱ्या (22 कि.मी. लांबी ) शिवडी ते न्हावा शेवा मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे काम वेगाने सुरू आहे. हा मार्ग सहा पदरी असून 16.5 कि.मी. समुद्रा वरून तर 5.5 कि.मी. मार्ग जमिनी वरील पिलरवरून जाणार आहे. या मार्गाला मध्य मुंबईत शिवडी, शिवाजीनगर येथे आणि नॅशनल हायवे क्र. 4 बी येथे चिर्ले येथे इंटरचेंज असणार आहे. सध्या वाहनाने दक्षिण मुंबईतून न्हावा शेवा येथे पोहचण्यास दीड ते दोन तास लागतात. हा मार्ग पूर्ण झाल्यास अवघ्या 20 मिनिटांत हे अंतर कापणे शक्य होणार आहे. तसेच शिवडी ते वरळी सागरी सेतू असा कनेक्टर बांधण्याचे काम सुरू असल्याने वांद्रे ते थेट शिवडी ते न्हावा शेवा मार्गे मुंबई ते पुणे एक्प्रेस वे गाठता येणार आहे.