| माथेरान | वार्ताहर |
सन 1850 मध्ये ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सर ह्युज मॅलेट यांनी माथेरानचा शोध लावला त्यास जवळपास पावणेदोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. तरीसुद्धा याठिकाणी अद्याप विकासाच्या पाऊलखुणा या भूमीत उमटल्या नाहीत. पर्यटन वाढीच्या दृष्टीने महत्त्वाची वाहतुकीची व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासन आणि आजवरचे संबंधीत सर्वच तालुक्यातील लोकप्रतिनिधी सुध्दा मतांच्या राजकारणापायी हे अपयशी ठरले आहेत. नेरळ ते माथेरान या एकमेव मार्गाशिवाय अन्य पर्यायी व्यवस्था उपलब्ध झालेली नसल्याने पर्यटक येत नाहीत. त्यामुळे माथेरानमधील पर्यटन अन्य स्थळांप्रमाणे बाराही महिने बहरत नाही. केवळ ठराविक सुट्टयांच्या भरवशावर इथला भूमिपुत्र आपल्या व्यवसायाची आर्थिक गणिते सोडविण्यासाठी तारेवरची कसरत करत आहे.
नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवजयंतीच्या दिवशी किल्ले शिवनेरीवर राज्यातील काही पर्यटनस्थळे विकसित करण्यात येणार असल्याचे आपल्या भाषणात सांगीतले आहे. त्याप्रमाणे त्यांनी रायगड जिल्ह्यातील या सुंदर स्थळाकडे सुध्दा जातीने लक्ष केंद्रित करून पर्यायी सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. याकामी 21 एप्रिल 2023 रोजी मनोज खेडकर, शिवाजी शिंदे, सुनील शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन दस्तुरी येथील वाहन कोंडी टाळण्यासाठी एम.पी. प्लॉट 93 हा नगरपरिषदेकडे हस्तांतरण करण्यात यावा. त्याचबरोबर पनवेल-धोदाणी मार्गे माथेरान हा प्रस्तावित फिनिक्युलर रेल्वे प्रकल्प सुरू करावा, जेणेकरून माथेरान हे पर्यटनस्थळ जगाच्या नकाशावर येईल आणि पर्यटन क्रांती घडेल यासाठी निवेदन सादर केले होते.
श्री मलंगगडाच्या धर्तीवर माथेरानचा प्रस्तावित फिनिकुलर रेल्वे हा प्रोजेक्ट शासनाने करायला पाहिजे. ज्यामूळे हजारो कुटुंबाना रोजगार निर्मिती होईल व माथेरानचे पर्यटन अधिक विकसित होईल.
शिवाजी शिंदे
माजी विरोधी पक्षनेते माथेरान