मुख्यमंत्र्यांचा जिल्हा अनुदानाविना

प्राथमिक शाळांतील शिक्षकांचे वेतन रखडले

। ठाणे । प्रतिनिधी ।

ठाणे जिल्ह्यातील अंशतः अनुदानित खासगी प्राथमिक शाळांत 20, 40, 60 टक्के अशा तुटपुंज्या पगारावर कार्य करणार्‍या शिक्षकांचे मागील दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. सरकारकडून अंशतः शिक्षकांसाठी निधी उपलब्ध करून देताना अनेकदा अडचणी येत असल्याने वारंवार पगार रखडत आहेत. त्यामुळे आर्थिक गर्तेत सापडलेल्या शिक्षकांनी गणेशोत्सवापूर्वी वेतन न मिळाल्यास ठाणे वेतन अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्धार केला आहे.

जिल्ह्यातील 20, 40 आणि 60 टक्के अनुदानावर काम करणार्‍या खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षकांना 12 हजार ते 40 हजारपर्यंत वेतन दिले जाते. मात्र, शिक्षकांना हे वेतनही वेळेवर दिले जात नाही. दरवेळी इतर जिल्ह्यांना निधी मंजूर केला जात असताना ठाणे जिल्ह्यालाच सापत्न वागणूक देत निधी रखडवला असल्याची सद्यस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्याला शिक्षकांच्या पगारासाठी निधी मिळाला नसल्याने जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे अंशतः अनुदानित शिक्षकांचे वेतन रखडले आहे. मागील महिन्यात ठाणे जिल्ह्यासाठी आवश्यक निधीच्या 50 टक्केच निधी उपलब्ध झालेला होता. यामुळे नियमित वेतन होऊ शकले नाही. 4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवापूर्वी जर या शिक्षकांना वेतन मिळाले नाही तर गणेशोत्सव साजरा करण्याऐवजी ठाणे वेतन अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्धार शिक्षकांनी केला आहे.

काळा शिक्षक दिन साजरा करणार
शंभर टक्के अनुदानावरील शिक्षकांचे पगार वेळेवर होत असताना अंशतः अनुदानित शाळांच्या 3 हजार 261 या लेखाशिर्षासाठी निधीची कमतरता असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान अनेक शिक्षकांचे कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेकडून विचारणा केली जात आहे. शिवाय गणेशोत्सव तोंडावर असताना दोन महिने पगार नसल्याने सणासुदीला या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे संतापलेल्या शिक्षकांनी 5 सप्टेंबर रोजी काळा शिक्षक दिन साजरा करण्याचा व गणेशोत्सवापूर्वी वेतन न मिळाल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

शिक्षकांच्या वेतनासाठी सध्या योग्य प्रमाणात निधी उपलब्ध नसल्याने वेतन रखडले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील वेतन अधिक्षकांनी योग्य वेळी, योग्य प्रमाणात निधीची मागणी केल्यास अशी समस्या उद्भवणार नाही. दरम्यान शिक्षक आमदार म्हणून शिक्षण संचालक व मंत्रालय स्तरावर प्रयत्न करून निधी मंजूर करून घेतला असून सोमवारनंतर गणेशोत्सवापूर्वी रखडलेले पगार होण्याची शक्यता आहे.

आ. ज्ञानेश्‍वर म्हात्रे,
कोकण शिक्षक मतदारसंघ
Exit mobile version