| ठाणे | वृत्तसंस्था |
कोलकात्यामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार व हत्येचे प्रकरण ताजे असतानाच ठाणे जिल्ह्यातील आणखी एका अत्याचाराच्या घटनेची भर आता पडली आहे. एका 13 वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेत 28 वर्षीय आरोपीला सोमवारी (दि.26) अटक केली. तो भिवंडीतील आझाद नगर इथला रहाविसी आहे. त्याने आधी पीडित मुलीशी मैत्री केली. मग तिला व तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी वारंवार घरी येऊ लागला. एकेदिवशी मुलीचे आई-वडील बाहेर गेले असताना तो घरी आला व तिला लग्नाचे वचन देऊन जबरदस्तीने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. हा सगळा प्रकार मे महिन्यापासून सुरू झाला, मात्र सोमवारी जेव्हा मुलीने त्याला विरोध केला, तेव्हा त्याने तिला मारहाण केली व धमकीही दिली. आरोपीने केलेल्या मारहाणीमुळे मुलगी घाबरून गेली व तिने पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, पॉक्सो अधिनियमाअंतर्गत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.