दोन चिमुकल्यांची सुखरूप सुटका
। ठाणे । प्रतिनिधी ।
कल्याणमधून दोन चिमुकल्यांचे अपहरण करणाऱ्या टोळीला कासा पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या दोन चिमुकल्यांची सुटका झाली असून दोन्ही चिमुकले सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांकडे परतली.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी नाका परिसरात एका ठिकाणी हाणामारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ तेथे जाऊन हा वाद मिटवला. त्याचवेळी त्यांच्या गाडीमध्ये दोन चिमुकली मुले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या दोन चिमुकल्यांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना रेल्वे स्थानकावरून या चारही जणांनी उचलून आणल्याचा प्रकार समोर आला. हे चारही आरोपी कल्याण येथून या मुलांचे अपहरण करून गुजरातच्या दिशेने जात होते. पोलिसांनी या चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता कल्याणच्या महात्मा फुले नगर पोलीस ठाण्यात या दोन चिमुकल्यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे समझले.
सत्यम मिश्रा (7) आणि सुरज मिश्रा (9) अशी या दोन चिमुकल्यांची नाव असून ते कल्याण येथील रहिवासी असल्याचे समोर आले. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे ही दोन्ही मुले सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांकडे परतली.