बाळगोपाळ रमले किल्ले बनविण्यात

| माणगाव | वार्ताहर |

दिवाळी व किल्ल्यांची मोठी परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लहानगे, प्रौढ माणसे किल्ल्यांच्या प्रतिकृती आपल्या घरासमोर, सोसायटीच्या आवारात व सार्वजनिक ठिकाणी तयार करतात. तसेच आकाशकंदील घरासमोर लावतात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अगोदरच शाळांना सुट्टी जाहीर झाल्याने व प्रथम सत्राच्या परीक्षा संपत असल्याने बच्चे कंपनी किल्ले बांधण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

यावर्षी शाळा, कॉलेज व तालुकास्तरावरील अनेक ठिकाणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात किल्ल्यांची असलेली पार्श्वभूमी किल्ले बांधणीला आगळेवेगळे महत्व आहे. दिवाळीनिमित्त बाजारपेठेतही तयार किल्ल्यांच्या प्रतिकृती विकण्यासाठी उपलब्ध झाल्या असून विविध आकार, प्रकार यामध्ये या प्रतिकृती दिसून येत आहेत. दिवाळीनिमित्त बच्चे कंपनी किल्ले बांधण्यात व आकाश कंदील बनविण्यात मग्न असून ज्येष्ठांचीही त्यांना मदत होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिकृती, सिंहासन, रांगोळी, गवत, मावळे, सैनिक, प्राणी यांना चांगली मागणी असून किल्ल्यांच्या प्रतिकृतीसाठी यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते आहे. कागदापासून तसेच विविध प्रकारच्या वस्तूंचा वापर करून लहानगे आकाश कंदील बनविण्यात व्यस्त झाले असून शाळांमधून कार्यानुभव अंतर्गत आकाश कंदील बनविण्यात येत आहेत. किल्ले, आकाशकंदीलांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दिवाळीचा उत्साह दिसून येत असून बच्चे कंपनी किल्ले बांधण्यात आकाश कंदील बनविण्यात व्यस्त असल्याने पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

दिवाळीनिमित्त दरवर्षी शाळेच्या व पालकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही किल्ले बांधतो. गेल्या वर्षी कोरोनामुळे काहीशी मर्यादा आली होती. या वर्षी मात्र आम्ही मित्रांच्या मदतीने सुंदर अशी प्रतिकृती तयार केली आहे. मातीचा किल्ला बांधण्यात काही वेगळाच आनंद असतो तो आम्हाला यावर्षी मिळाला.

स्वराज मरवडे, विद्यार्थी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर किल्ले बांधणी करून ऐतिहासिक परंपरा जतन केली जाते. यातून किल्ल्यांची माहिती मिळत असते व निर्मितीचा आनंद मिळतो. यावर्षी पुन्हा लहानगे किल्ले बनविण्यात व्यस्त असल्याने समाधान वाटत आहे.

श्रीकृष्ण गरदे, इतिहास शिक्षक
Exit mobile version