पाचल-बौद्धवाडीत मुले रमली दप्तरमुक्त शाळेत

। राजापूर । वृत्तसंस्था ।
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पाचल बौद्धवाडी या सेमी इंग्रजी शाळेने ’’दप्तरमुक्त शाळा’’ आणि विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी ’’आनंदमयी शिक्षण’’ हा नवोपक्रम सुरू केला आहे. दप्तरमुक्तीचा उपक्रम राबवणारी पाचल-बौद्धवाडी ही राजापूर तालुक्यातील पहिली शाळा ठरली आहे.
विद्यार्थी पाठ्यपुस्तके शाळेमध्ये ठेवतात. दिवसभर शाळेमध्येच विद्यार्थी अभ्यास करतात. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि त्यांना दैनंदिन होमवर्क देण्यासाठी अन् त्याच्या नोंदी ठेवण्यासाठी, दिवसभरातील प्रशालेतील अभ्यासासाठी एक तर, शाळेतून घरी गेल्यानंतर करावयाच्या अभ्यासाची एक अशी दोन वर्कबुक असतात. घरी करावयाच्या अभ्यासाचे एक वर्कबुक घेऊन विद्यार्थी घरी जातो आणि तेच घेऊन शाळेत आणतो. लॉकरमध्ये अभ्यासाची पुस्तके, शैक्षणिक साहित्य ठेवले जाते.
गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू, विस्तार अधिकारी विनोद सावंग, केंद्रप्रमुख सीताराम कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक नितीन पांचाळ आणि उपशिक्षक जयराज पांगरीकर या द्वयींनी लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, पालक, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने काही वर्षापूर्वी लुंबिनी बुद्धविहारामध्ये सुरू झालेल्या या वस्तीशाळेचे एका ’’आदर्शवत जिल्हा परिषद शाळेमध्ये रूपांतर केले आहे. पालकही या शाळेमध्ये आपल्या पाल्याला दाखल करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे पटसंख्या 75 वर गेली आहे.

Exit mobile version