दिवाळीनिमित्त बच्चेकंपनीकडून किल्ले उभारणीची लगबग

| खांदेश्वर | प्रतिनिधी |

दिवाळीचा सण जवळ येताच बालमावळ्यांमध्ये किल्ले उभारणीचा उत्साह संचारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या इतिहासाची प्रेरणा देणारे किल्ले साकारण्यासाठी मुलांनी पुढाकार घेतला आहे. नवीन पनवेल सेक्टर 13 येथे बालमावळ्यांकडून ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती उभारण्याचे काम सुरू झाले असून, परिसरात दिवाळीपूर्वीच शिवकालीन वातावरण निर्माण झाले आहे.

दिवाळी आणि किल्ले उभारणी हे मराठी संस्कृतीचे जुने नाते आहे. माती, दगड, विटा आणि विविध सजावटीच्या साहित्याचा वापर करून मुले किल्ल्यांची निर्मिती करतात. यातून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि स्वराज्याच्या लढ्याची ओळख होते. नवीन पनवेल सेक्टर 13 मधील मुलांनी एकत्र येत किल्ला उभारणीला सुरुवात केली आहे. किल्ल्याची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार आणि ऐतिहासिक वास्तू साकारण्यासाठी बालमावळ्यांची लगबग सुरू आहे. किल्ल्याला ऐतिहासिक स्वरूप देण्यासाठी मुले विशेष मेहनत घेत आहेत. मोबाईल आणि संगणकाच्या युगातही नव्या पिढीकडून किल्ले उभारणीची परंपरा जपली जात असल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळत आहे. बालमावळ्यांच्या या उत्साहाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Exit mobile version