चिलठणची ग्रामसभा ठरली वादळी

बॉम्बे रॉकिंग प्रकल्पाला विरोध

| वावोशी | वार्ताहर |

खालापूर तालुक्यातील चिलठण ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आलेली ग्रामसभा वादळी ठरली. या ग्रामसभेत सरपंच, ग्रामसेविका व ग्रामस्थ यांच्यात गावातील पाण्याची समस्या तसेच गावात येणार्‍या नवीन प्रकल्पाच्या मुद्द्यावर जोरदार खडाजंगी झाल्याचे समोर आले आहे.

या ग्रामसभेत ग्रामस्थांनी ठरलेल्या वेळेत कोरम पूर्ण न केल्याचे कारण सरपंच गौतम ओव्हाळ यांनी सांगून ही ग्रामसभा तहकूब करत ग्रामसभेतून बाहेर पडल्याचे सांगितले आहे. तर ग्रामस्थांनी ग्रामसभेचा कोरम पूर्ण करून ओव्हाळ यांना विनंती करीत ग्रामसभा घेण्यास सांगितले असता त्यांनी तसे न करता गावातील मूलभूत प्रश्‍नांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सरपंचांनी ग्रामसभेचा त्याग केल्यानंतर ग्रामस्थांनी अर्धा तास सरपंचांची वाट पाहिली परंतू सरपंच न आल्याने नाईलाजाने ग्रामस्थांनी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ परशुराम गायकर यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी चिलठण ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या बॉम्बे रॉकिंग कंपनी प्रकल्प हा ग्रामस्थ, शेतकरी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असल्याच्या कारणास्तव या प्रकल्पाला ग्रामसभेत कडाडून विरोध केला.

या ग्रामसभेला जगदीश भगत, राजू डोखले, दगडू देवकर, नितीन देवकर, रंजना पाटील, अस्मिता गायकर, समीर पाटील, अरुण घोंगे, जयदास घोंगे, विकास दुधाने, शितल डोखले, दगडू देवकर, गीता डोखले, खंडू पाटील, परशुराम पाटील, रोशन पाटील, अरुण डोखले, नितीन पाटील, संदीप डोखले, प्रमोद देवकर, अंबाजी डोखले, दत्तात्रेय चोरगे, अशोक गायकर, देविदास घोंगे, सपना घोंगे, सुशीला मोरे, प्रमोद देवकर ,परशुराम गायकर, ग्रामसेविका मनाली म्हसे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझ्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा घेण्यात आली होती परंतू कोरम अभावी ही ग्रामसभा तहकूब करण्यात आली असताना देखील ग्रामसेविका व ग्रामस्थांनी घेतलेली ग्रामसभा ही अटी, शर्ती व नियमांचे उल्लंघन करून घेण्यात आली आहे.

गौतम ओव्हाळ
सरपंच चिलठण ग्रामपंचायत

ग्रामसभा सकाळी साडेअकरा वाजल्यानंतर तहकूब केल्यानंतर सरपंच गौतम ओव्हाळ ग्रामसभेतून बाहेर पडल्यानंतर ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाल्यानंतर व कोरम पूर्ण केल्यानंतर मात्र ही ग्रामसभा घेण्यात आली.

मनाली जोरकर- म्हसे
ग्रामसेविका

Exit mobile version