चीनलाही पराग बोरसे यांच्या चित्रांची भुरळ

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत येथील आंतराराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पराग बोरसे यांच्या एका चित्राची निवड चीनमध्ये होणार्‍या चित्र प्रदेशांसाठी केली आहे. जगातील नामांकित 50 चित्रकारांची चित्रे या प्रदेशात मांडण्यात येणार असून अमेरिकेत सलग दोन वर्षे चित्र प्रदर्शनात सहभागी झालेल्या पराग बोरसे या मराठमोळ्या चित्रकाराच्या चित्रांना चीन मध्ये बोलावून घेतल्याने त्यांच्या चित्रांना आता चायना मेडचे गोंदण मिळणार आहे. चीनमधील पहिल्या किंग लियन 2021 पेस्टल प्रदर्शन आणि सातव्या झूहाई शुतोंग स्टुडिओ पेस्टल आमंत्रित प्रदर्शनासाठी जगभरातून तेवीस आंतरराष्ट्रीय चित्रकारांना आमंत्रित करण्यात आले आहे. भारतातून आमंत्रित केले गेलेले पराग बोरसे हे एकमेव चित्रकार ठरले आहेत. या प्रदर्शनामध्ये 55 चीनमधील चित्रकार आणि 23 आंतरराष्ट्रीय चित्रकारांचा समावेश आहे.हे प्रदर्शन लियन यीकिंग पेस्टल गॅलरी ऑफ फोकआर्ट सेंटर, वांझाई सिटी, झुहाई, चायना येथे 20 डिसेंबर पर्यंत चालू राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये पराग बोरसे यांचे शोल्डरिंग द लव हे व्यक्तचित्रण मांडण्यात आले आहे. शेळीच्या पिल्लाला आपल्या मुला-बाळांप्रमाणे खांद्यावर खेळवणार्‍या एका वृद्ध धनगराचे हे चित्र आहे. या माणसाच्या चेहर्‍यावरील स्मितहास्य आणि डोळ्यामधील वात्सल्यपूर्ण भाव हे या चित्राचे वैशिष्ट्य आहे. जगाच्या बाजारपेठेवर कब्जा करणार्‍या चीनला चित्रकार पराग बोरसे यांचे चित्र मात्र आयात करावे लागल्याने सर्वच स्तरातून पराग बोरसे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version