। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन 9 ऑक्टोबर रोजी होईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिली. या विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी चिपी विमानतळासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) हा प्रकल्प हाती घेऊन आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करून या विमानतळाचे काम पूर्ण केले आहे.
एकूण 286 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली. यासाठी सुमारे 520 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यात आयआरबी, सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. यांना विमानतळ उभारणी, फायनान्स तसेच ऑपरेशन्ससाठी भाडेतत्त्वावर (लीजवर) हे काम देण्यात आले आहे. विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी लागणाऱया पाण्याचा पुरवठा, रस्ते विकास, संरक्षक भिंत यासारखी कामे एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. यासाठी एमआयडीसीने 14 कोटी रुपयांचा खर्च केला आहे.
कोकणच्या विकासाला चालना
विमानतळ प्राधिकरण, नागरी विमान महासंचालनालय यांच्यातर्फे लागणारे सर्व परवाने प्राप्त झाले आहेत. विमानतळासाठी विकास करार झाले आहेत. विमानतळामुळे कोकणाच्या विकासाला चालना मिळेल, पर्यटन व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. कोकणाचे आकर्षण असलेल्या समुद्रापर्यंत अधिकाधिक पर्यटकांना पोहोचता येईल, अशी प्रतिक्रिया यावेळी सुभाष दसाई यांनी दिली.