। चिपळूण । प्रतिनिधी ।
वाचनामुळे आत्मपरिवर्तन घडते. आजची पिढी काय वाचत आहे, यावर देशाचे उद्याचे भवितव्य अवलंबून असते, असे प्रतिपादन पेढे येथील आर. सी. काळे विद्यालयाच्या निवृत्त शिक्षिका शिला केतकर यांनी केले. चिपळूण नगर परिषदेने दर रविवारी दोन तास निसर्गाच्या सानिध्यात वाचू आनंदाने, असा उपक्रम सुरू केला आहे. रविवारी (दि. 04) खेंड हवेली येथे हा उपक्रम पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी चिपळूण शहराचा केवळ भौगोलिक विकास, एवढाच विचार न करता साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून शहराला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केलं आहे. विचारांची व्यापकता वाचनातून मिळते, वाचनावर देशाचे भवितव्य अवलंबून असते, यामुळेच चिपळूण नगर परिषदेने सुरू केलेला वाचू आनंदाने हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे व्याख्याते मंदार ओक यांनी सांगितले.
वाचनानंतर राष्ट्रपाल सावंत यांनी वाचनाचे महत्त्व सांगणारी कविता सादर केली. सई वरवटकर यांनीही वाचू आनंदाने या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच, मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवून मुलांनी वाचायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लाघवी सावे या विद्यार्थिनीने वाचनातून मराठी शब्दसंग्रह वाढल्याचे सांगितले. तर मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी वाचू आनंदाने या उपक्रमात सहभागी व्हावे, अशी आमची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची जोशी यांनी केले, तर आभार बापू काणे यांनी मानले. पुढील रविवारी पेठमाप येथील विठ्ठल मंदिरामध्ये हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.