उपोषणकर्त्यांची घेतली चित्रलेखा पाटील यांनी भेट

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील ढवर येथील प्रभाकर राणे यांच्या मालकीच्या जागेत अनधिकृत बांधकाम करण्यात आले. ग्रामसेवकांनी पदाचा गैरवापर करीत असेसमेंटची नोंदही दप्तरी केली. त्यामुळे राणे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी शुक्रवारी (दि. 16) उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे आश्‍वासन दिले.

ढवर गावातील प्रभाकर धर्मा राणे यांची गट नंबर 775 मध्ये मालकीची मिळकत आहे. या मिळकतीमध्ये शिवराम पाटील यांनी अनधिकृत बांधकाम केले. हे बांधकाम नियमित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. ही बाब राणे यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकांच्या निदर्शनास आणून दिली. हा गैरप्रकार होत असल्याचे सांगूनदेखील ग्रामसेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत शिवराम पाटील यांनी बांधलेल्या अनधिकृत घराच्या असेसमेंटची नोंद दप्तरी केली. त्याविरोधात राणे यांनी गुरुवारी (दि. 15) उपोषण सुरु केले आहे. राजकीय हस्तक्षेप, ग्रामसवेकाच्या मनमानी कारभाराविरोधात ढवर येतील ज्येष्ठ ग्रामस्थ प्रभाकर राणे उपोषणाला बसले आहेत. ही बाब शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या लक्षात आली. त्यांनी शुक्रवारी दुपारी उपोषणकर्ते राणे यांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून सर्व माहिती घेतली. संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांना संपर्क साधून तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना केली. यावेळी ढवरचे माजी सरपंच, माजी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांनी ग्रामपंचायतीला याबाबत पत्र देऊन योग्य ती कार्यवाही दोन आठवड्यात करून त्याचा अहवाल कार्यालयाला सादर करावा, असे सांगितले.

ग्रामसेवक व इतर सरकारी अधिकारी यांनी राजकीय दबावाला बळी पडू नये. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची दक्षता घ्यावी. राणे कुटुंबियांना आम्ही नक्कीच न्याय मिळवून देणार, अन्यथा कायदेशीर लढाई लढणार.

चित्रलेखा पाटील,
शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख

Exit mobile version