जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील तीनशे शेतकर्यांनी बँकांचे आधार प्रमाणिकरण केले नाही. हे शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांनी 7 सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणिकरण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप यांनी केले आहे.
राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये जाहीर केली होती. त्यातील पुढील टप्प्यात 29 जुलै 2022 रोजी नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना अनुदानाची योजना जाहीर केली आहे. 2017-18, 2018-19- 2019-20 या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत नियमित कर्जफेड करणार्यांसाठी ही योजना आहे. या शेतकर्यांना 50 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाणार आहे. मात्र, रायगड जिल्ह्यातील 300 लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण केले नसल्याची माहिती शासनाच्या पोर्टलवर दिसून आली आहे. त्यासाठी शासनाने 12 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत आधार प्रमाणिकरण करण्याची संधी दिली आहे. आधार प्रमाणिकरण न केल्यास शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांनी तातडीने आधार प्रमाणिकरण करावे.
आधार प्रमाणिकरणासाठी आपले सरकार सेवा केंद्राकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार आहे. आधार प्रमाणिकरण करताना कोणत्याही अडचणी येत असल्यास त्याबाबत ऑनलाईन तक्रार प्रणालीद्वारे करावी. लाभाची रक्कम अमान्य असल्यास प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीकडे ऑनलाईन तक्रार करावी, तसेच तालुकास्तरीय समितीकडेही तक्रार करता येणार आहे. आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.