टाईम्स ऑफ इंडियाच्या ईटी इंस्पायरिंग वुमन अवॉर्डचा सन्मान
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख, कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक, प्रभाकर पाटील एज्युकेशन ट्रस्टच्या कार्यवाह, सीएफटीआयच्या अध्यक्षा नगरसेवीका चित्रलेखा पाटील यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेत टाईम्स ऑफ इंडियाच्या वतीने ईटी इंस्पायरिंग वुमन अवॉर्ड या राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक उद्योजकता (40 वर्षांखालील) कॅटगरी सन्मानित करण्यात आले. दिल्लीमध्ये हा पुरस्कार बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दिल्ली येथे पार पडलेल्या या दिमाखदार पुरस्कार सोहळ्याच्यानिमित्ताने चित्रलेखा पाटील यांच्यावर विविध क्षेत्रातून चौफेर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विविध क्षेत्रात तितक्याच ताकदीने कार्यरत असलेल्या चित्रलेखा पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊनच टाइम्स ऑफ इंडियाच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोरोना काळात, महापूर किंवा चक्रीवादळ या प्रत्येक संकटात जनतेच्या सोबत राहून जे कार्य केलेले आहे. त्याची दखल घेत या देशव्यापी पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. चित्रलेखा पाटील यांनी 10 हजार विद्यार्थीनींना सायकल वितरण करण्याचा निर्धान केला असून आतापर्यंत मोठया संख्येने सायकलीचे वितरण देखील करण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सुमारे 2 लाख कुटूंबांना जिवनावश्यक अन्नधान्याचे वाटप केले आहे. त्याचबरोबर चक्रीवादळाच्या संकटात देखील उध्वस्त झालेल्या ग्रामस्थांना आधार देत घराचे पत्रे तसेच आर्थिक मदत देखील करण्यात आली. सध्याच्या पुरपरिस्थीतीमध्ये देखील चित्रलेखा पाटील यांनी मागे न राहता 25 हजार किलो अन्नधान्याचे वाटप केले. त्याशिवाय कृषीवलच्या माध्यमातून पुरग्रस्तांना विविध जिवनावश्यक वस्तूचे देखील वाटप केले आहे. विविध क्षेत्रात राहून आपले समाजकार्य सुरु ठेवणार्या चित्रलेखा पाटील यांच्या या सर्व कार्याचा गौरव म्हणूनच या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.