रिया टायगरचा पराभव, हॅट्ट्रिकची संधी हुकली; अद्विक-रुत्वी वॉरिअर्सचा ‘सुपर’ विजय
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौलमळा गावात ग्रामदेवता आई कृष्णादेवीच्या आशीर्वादाने आणि “एक दिवस एकजुटीसाठी, एक दिवस गावासाठी” या प्रेरणादायी संकल्पनेतून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सलग दोन वर्षे विजेतेपद पटकावणारे संघमालक सचिन आमरे आणि कर्णधार प्रशांत आमरे यांच्या नेतृत्वाखालील रिया टायगर संघ यंदा विजयाची हॅट्ट्रिक साधण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. मात्र, संघमालक मंदार नाईक आणि कर्णधार मनीष नाईक यांच्या अद्विक-रुत्वी वॉरिअर्सने जिद्द, संयम आणि धैर्याच्या जोरावर सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय मिळवत रिया टायगरची विजयी मालिका खंडित केली आणि विजेतेपद खेचून आणले.
चौलमळा क्रिकेट संघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेली चौलमळा प्रिमिअर लीग-पर्व तिसरे ही क्रिकेट स्पर्धा रविवारी (दि.1) उत्साह, जल्लोष आणि एकोप्याच्या वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष होते. गावकऱ्यांचा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा गावचे प्रमुख रवींद्र घरत, उपप्रमुख जितेंद्र पाटील, युवक मंडळ अध्यक्ष महेंद्र नाईक आणि उपाध्यक्ष अल्पेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चौलमळा क्रिकेट संघाच्या सर्व सभासदांनी अहोरात्र मेहनत घेत नियोजन, व्यवस्था आणि समन्वयाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. त्यांच्या परिश्रमामुळेच हा क्रीडा सोहळा दिमाखात साकार झाला.
अंतिम सामना रिया टायगर आणि अद्विक-रुत्वी वॉरिअर्स यांच्यात अत्यंत चुरशीचा व प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारा ठरला. सामन्याच्या सुरुवातीलाच रिया टायगरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून अचूक टप्प्यावर मारा करत अद्विक-रुत्वी वॉरिअर्सच्या फलंदाजांना पूर्णतः जखडून ठेवले.
तीन षटकांच्या सामन्यात अद्विक-रुत्वी वॉरिअर्स संघाला अवघ्या 26 धावांवर रोखण्यात रिया टायगरला यश आले. 27 धावांचे माफक लक्ष्य पाहता रिया टायगर सहज विजय मिळवेल आणि हॅट्ट्रिक साजरी करेल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, अद्विक-रुत्वी वॉरिअर्सच्या गोलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन करत सामन्यात रंगत आणली. अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी करत रिया टायगरच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. निर्धारित षटकांत रिया टायगरलाही 26 धावांवर रोखण्यात आले आणि सामना बरोबरीत सुटत सुपर ओव्हरमध्ये पोहोचला.
सुपर ओव्हरचा थरार
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना रिया टायगरने एका षटकात 14 धावांचे लक्ष्य उभे केले. अद्विक-रुत्वी वॉरिअर्ससमोर आता 15 धावांचे आव्हान होते. रिया टायगरकडून सुपर ओव्हर प्रशांत आमरे यांनी टाकली. अद्विक-रुत्वी वॉरिअर्सकडून अनिकेत म्हात्रे आणि जितेंद्र जाधव ही सलामीची जोडी मैदानात उतरली. पहिल्या पाच चेंडूंमध्ये या जोडीने धडाकेबाज फलंदाजी करत 12 धावा फटकावल्या. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी तीन धावांची आवश्यकता असताना पुन्हा सामना टाय होऊन आणखी एक सुपर ओव्हर होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र दबावाच्या क्षणी अष्टपैलू अनिकेत म्हात्रेने प्रशांत आमरे यांच्या अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकला आणि अद्विक-रुत्वी वॉरिअर्सला संस्मरणीय विजय मिळवून दिला. क्षणातच मैदानात एकच जल्लोष उसळला. सहकाऱ्यांनी अनिकेतला खांद्यावर उचलून आनंद साजरा केला. अष्टपैलू कामगिरीबद्दल अनिकेत म्हात्रेला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
जल्लोषात ट्रॉफी उंचावली
अखेर अद्विक-रुत्वी वॉरिअर्स संघ विजेता ठरल्याने संघमालक मंदार नाईक आणि कर्णधार मनीष नाईक यांच्या हस्ते ट्रॉफी उंचावण्यात आली. टाळ्यांचा कडकडाट, जल्लोष आणि आनंदाच्या घोषणांनी संपूर्ण मैदान दणाणून गेले. रिया टायगरनेही कडवी झुंज देत अंतिम सामन्याला खरी रंगत आणली.
ही लीग केवळ क्रिकेटची स्पर्धा नसून गावाच्या एकजुटीचा, आपुलकीचा आणि सकारात्मक ऊर्जेचा उत्सव ठरली. मैदानावर स्पर्धा झाली, पण मनात मात्र सर्वांनी एकोप्याची भावना जपली. जिंकणारा संघ एकच असला तरी आनंद साजरा करणारे संपूर्ण गाव होते, हेच या स्पर्धेचे खरे यश आहे.
रवींद्र घरत,
गावप्रमुख, चौलमळा







