समाजसेवक प्रशांत रणवरे यांचा विरोध ठरला ठोस
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कळंबोली सेक्टर 17 येथील प्लॉट क्रमांक 04 येथे प्रस्तावित ‘रॉयल स्टॅग बूमबॉक्स’ संगीत महोत्सवाला अखेर सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड (सिडको) प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित करणे योग्य नसल्याचा अहवाल पोलीस प्रशासनाकडून मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. संबंधित आयोजकांकडून सिडकोकडे जागेच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, कळंबोली पोलिसांकडून आलेल्या अहवालात या कार्यक्रमामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार सिडकोने आयोजकांचा अर्ज फेटाळत कार्यक्रमास नकार दिला आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाला सुरुवातीपासूनच स्थानिक स्तरावर विरोध होत होता. समाजसेवक प्रशांत रणवरे यांनीही या कॉन्सर्टला तीव्र विरोध दर्शवला होता. मद्य प्रायोजित कार्यक्रमामुळे परिसरातील वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी मांडले होते. त्यांच्या या भूमिकेला अनेक नागरिकांचा पाठिंबा मिळाला होता.
याबाबत दैनिक ‘कृषिवल’मध्येही रणवरे यांच्या विरोधाची बातमी प्रसिद्ध झाली होती. आता सिडकोच्या निर्णयामुळे स्थानिकांच्या आक्षेपांना अधिकृत मान्यता मिळाल्याचे मानले जात आहे. सिडकोच्या या निर्णयामुळे कळंबोली परिसरात होणारा संभाव्य गोंधळ टळल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेणे आवश्यक असल्याचे मतही पुढे येत आहे.





