अनधिकृत होर्डिंगवर सिडकोची कारवाई

| पनवेल | प्रतिनिधी |

पावसाळ्यात वादळी वाऱ्यांमुळे अवाढव्य जाहिरात होर्डिंग कोसळण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी सिडकोने अनधिकृत होर्डिंग विरोधात कठोर भूमिका घेत, संबंधित होर्डींग जमीनदोस्त करण्याची कारवाई हाती घेतली आहे. त्यामुळे अनधिकृतपणे होडींग उभारुन बेकायदेशीररित्या जाहिरातबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सिडकोच्या हद्दीत नैनासह इतर भागांमध्ये सिडकोच्या नियमावलीचे उल्लंघन करुन, तसेच कोणतीही अधिकृत परवानगी न घेता अनेक ठिकाणी अवाढव्य असे जाहिरात होर्डींग उभारण्यात आले आहेत. हे होर्डींग महामार्गालगत असल्याने वादळी वाऱ्याच्या काळात ते अपघाताला कारणीभूत ठरु शकतात. हा धोका ओळखून सिडकोच्या अनधिकृत बांधकाम (नैना) विभागामार्फत विनापरवाना उभारण्यात आलेले अवाढव्य जाहिरात फलक हटविण्याची कारवाई करण्यात आली. मुंबई-राष्ट्रीय महामार्गालगत पळस्पे येथील खंडोबा हॉटेलसमोर, तसेच अरिहंत बिल्डिंगजवळ उभारलेल्या अनधिकृत जाहिरात फलकधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. परंतु, संबंधितांनी फलक न काढल्याने अखेर सिडकोने निष्कासन मोहीम राबवत हे फलक हटवले. ही कारवाई मुख्य दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार आणि मुख्य नियंत्रक प्रशांत भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत अतिक्रमण विभागाचे दत्तात्रय चौरे, जितेंद्र परदेशी, भूमापक शिवराज चव्हाण, स्थानिक पोलीस, सिडको पोलीस पथक, महावितरण अधिकारी, सिडको सुरक्षा रक्षक तसेच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

Exit mobile version