| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
एकीकडे पनवेल परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे सिडकोच्या पंपिंग स्टेशनमधून पिण्याचे पाणी भरलेला टँकर थेट बांधकाम साईटवर जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. समाजसेवक प्रशांत रणवरे यांनी संबंधित टँकरचा पाठलाग करून बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला पाणीपुरवठा करताना तो पकडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या पंपिंग स्टेशनमधून पाणी भरल्यानंतर एक टँकर तेथून निघाला. या टँकरचा रणवरे यांनी पाठलाग केला. संबंधित टँकर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथे बांधकामासाठी पाणी सोडले जात असल्याचे निदर्शनास आले. पनवेल परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या अडचणींमुळे टँकरचा आधार घ्यावा लागत असताना पंपिंग स्टेशनमधून भरलेले पाणी बांधकामासाठी वापरले जात असल्याचे समोर आल्याने पाणीवाटप व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेबाबत सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रशांत चाहरे यांच्याकडे विचारणा करण्यात आली. टँकरचालकाने परस्पर हा प्रकार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित चालकावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, पाणीटंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्याचा वापर कोणत्या कारणासाठी केला जातो, याची स्पष्टता होणे आवश्यक असल्याचे रणवरे यांनी सांगितले. संबंधित प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी केली.
नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी येत असताना बांधकाम साईटवर पाण्याचा टँकर आढळला. या पाण्याचा वापर कोणत्या कारणासाठी करण्यात आला, याची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी.
प्रशांत रणवरे,
समाजसेवक
टँकरचालकाने परस्पर हा प्रकार केला आहे. संबंधित टँकरचालकावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
प्रशांत चाहरे,
अधिकारी, सिडको पाणीपुरवठा विभाग
