चार दिवसांत पुरवठा सुरळीत करा, अन्यथा ठिय्या आंदोलन
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कामोठे सेक्टर-21 परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असून, या प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाने सिडको प्रशासनाला चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू न झाल्यास सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेकापचे पनवेल महानगरपालिका जिल्हा कार्याध्यक्ष महादेव कुंडलिक वाघमारे यांनी दिला आहे.
यासंदर्भात वाघमारे यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग यांना लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनात स्टार हाइट-3, वरली टॉवर, शुभ अव्हेन्यू, गुरुदेव सोसायटी, ओम शिवशंकर सोसायटी, निर्झर, जय प्राची तसेच परिसरातील अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये अत्यल्प दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे.
पाणी कमी दाबाने येत असल्याने सोसायट्यांच्या भूमीगत टाक्या भरत नसून वरच्या मजल्यांपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत असून, घरगुती कामे, स्वच्छता आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. उंच इमारतींतील रहिवाशांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
सिडको प्रशासनाने तातडीने तांत्रिक अडचणी दूर करून नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शेकापने केली आहे. हा प्रश्न हजारो नागरिकांच्या मूलभूत गरजेशी संबंधित असल्याने त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे वाघमारे यांनी नमूद केले. चार दिवसांत प्रश्न निकाली न निघाल्यास सिडको कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आल्याने आता सिडकोच्या भूमिकेकडे कामोठेकरांचे लक्ष लागले आहे.







