नाल्यात पडून नागरिकाचा मृत्यू

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

। पनवेल । प्रतिनिधी ।

सेक्टर-1 येथील सुधागड शाळेजवळून पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या नाल्यात पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नाल्याची साफसफाई करताना काढण्यात आलेल्या संरक्षणात्मक लोखंडी जाळ्या पुन्हा बसविण्यात न आल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप होत आहे.

नाल्याच्या साफसफाईच्या कामादरम्यान नाल्यालगतच्या लोखंडी जाळ्या काढण्यात आल्या होत्या. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर या जाळ्या पुन्हा बसविण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नाल्यालगत कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर नाल्यालगतच्या संरक्षणात्मक जाळ्या का बसविण्यात आल्या नाहीत, याची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मनसे कळंबोली शहराध्यक्ष राहुल चव्हाण यांनी केली आहे.

भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सेक्टर-१ मधील हा नाला कायमस्वरूपी बंदिस्त करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. नाला बंदिस्त करण्याचे काम पूर्ण होईपर्यंत नाल्याभोवती मजबूत लोखंडी जाळ्या, संरक्षण कठडे आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था तातडीने उभारावी, अशी मागणीही राहुल चव्हाण यांनी केली आहे.

Exit mobile version