उरणमध्ये वाहतूक कोंडी; पाच मिनिटांच्या प्रवासाला दोन तास

। उरण । प्रतिनिधी ।

ऐन गणेशोत्सवाच्या काळात उरण तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने गणेशभक्त आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. तालुक्यातील दिघोडे-दास्तान, गव्हाणफाटा-दिघोडे आणि कोप्रोली नाका या परिसरात रोज संध्याकाळच्या सुमारास तासनतास गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अवघ्या पाच मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल दोन-दोन तास लागत आहेत. दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून कामावरून घरी परतणारे चाकरमानीही या कोंडीत अडकून पडत आहेत.

उरण तालुक्यात सीएफएस, वेअर हाऊस आणि कंटेनर यार्ड मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात अवजड वाहनांची कायमच मोठी वर्दळ असते. त्यातच गणेशोत्सवामुळे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कार आणि इतर वाहनांची संख्या अचानक प्रचंड वाढली आहे. रस्त्यावरून जाणारे अवजड कंटेनर ओलांडण्याच्या घाईत अनेक कार चालक समोरून येणाऱ्या वाहनांना जागा देत नाहीत, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी अवैधपणे उभी केलेली अवजड वाहने या कोंडीत आणखी भर घालत आहेत. दररोज संध्याकाळच्या वेळी ही समस्या अधिक गंभीर होत असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या गंभीर परिस्थितीवर बोलताना उरण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले की, गणेशोत्सवाच्या काळात या परिसरात अचानक कारची संख्या वाढली असून चालक मिळेल त्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे वाहतूक कोंडी अधिक वाढते. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या असून, खोपटा सर्कल ला कोपरोली कडे जाणारी अवजड वाहने बंद करण्यात आली आहेत. कळंबुसरे या ठिकाणी नो एंट्री लावण्यात आली आहे. संध्याकाळी पाचनंतर अवजड वाहनांना खोपटे या परिसरात थांबवून ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. यासाठी एक अधिकारी आणि पाच कर्मचारी तैनात करण्यात आले असून दिघोडे येथे वाहतूक कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

Exit mobile version