नागरिकांची सुरक्षा वार्‍यावर; ठेकेदाराचा निष्काळजीपणा


मोरी बांधणीच्या ठिकाणी दिशादर्शक फलक नाहीत

| खोपोली | प्रतिनिधी |

बीडखुर्द गावाजवळील मोरी बांधणीचे काम गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने निष्काळजीपणा करीत काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलके बॅरिकेट्स लावले नसल्यामुळे वाहनचालक, पादचार्‍यांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे ठेकेदाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.

खालापूर तालुक्यातील घोडीवली फाटा मार्गे घोडीवली गाव-नावंढे-केळवली- वणी-बीड-जांबरुंग-खरवई-डोळवली रस्ता मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांच्या विळख्यात सापडल्याने खड्ड्यांचा नाहक त्रास प्रवासीवर्गाला सहन करावा लागत असताना या मार्गावरील काही मोर्‍यांना मोठे भगदाड पडले असल्याने हा मार्ग अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे. या मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी यासाठी परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून निवेदन दिले आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मार्गाच्या दुरुस्तीला अंदाजे 13 लाख निधी उपलब्ध करून दिल्याने या मार्गावरील बीडखुर्द गावाजवळील मोरीच्या नूतनीकरणाचे काम गेल्या तीन दिवसापासून सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी संबंधित ठेकेदार निष्काळजीपणा करीत असल्याने हा निष्काळजीपणा वाहन चालकासह प्रवासी व पादचार्‍यांच्या जीवावर बेतू शकतो, त्यामुळे ठेकेदाराच्या मनमानी कारभाराबाबत सर्वजण नाराजी व्यक्त करीत आहेत. मोरीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना ठेकेदाराने कोणतीही सुरक्षा रक्षक फलके लावली नसल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

Exit mobile version