नागरिकांनी वणवा रोखण्यासाठी दक्ष राहा: डॉ. दत्ता कुंटेवाड

| तळा | प्रतिनिधी |

कोकणात उन्हाळ्याची चाहूल लागताच डोंगरांना वणवे लागण्याचे प्रमाण वाढते. रायगड जिल्ह्यातील तळा तालुका हा डोंगराळ आणि वनसंपत्तीने नटलेला भाग असल्याने, येथील निसर्गसंपदा आणि आंबा-काजू बागांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी वणवा लागणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन डॉ. दत्ता कुंटेवाड यांनी केले आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात अज्ञातांकडून किंवा मानवी हलगर्जीपणामुळे डोंगरांना आग लावली जाते. याचा मोठा फटका केवळ पर्यावरणालाच बसत नाही, तर शेतकऱ्यांच्या कष्टाने फुलवलेल्या फळबागाही खाक होतात. या पार्श्वभूमीवर डॉ. कुंटेवाड यांनी स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी नागरिकांना प्रतिबंधात्मक उपायही सुचवलेले आहेत.

राब जाळताना खबरदारी

शेतकरी बांधवांनी शेतीची मशागत करताना 'राब' पेटवताना तो नियंत्रणाबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. वाऱ्याचा वेग पाहूनच शेतातील कचरा जाळावा.
फायर लाईन (जाळ पट्टा)

आपल्या बागेभोवतीचा पालापाचोळा साफ करून फायर लाईन तयार करावी, जेणेकरून डोंगरावरील आग बागेत शिरणार नाही.
ज्वलंत वस्तू फेकू नका

जंगलातून प्रवास करताना पेटती काडी, सिगारेट किंवा विडीचे थोटूक फेकू नये. पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना आग लागणार नाही याची जाणीव ठेवावी.
वन्यजीवांचे रक्षण

वणव्यामुळे अनेक दुर्मिळ पक्षी, सरपटणारे प्राणी आणि कीटक नष्ट होतात. निसर्गाचे हे चक्र टिकवण्यासाठी वणवा रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वणवा लागल्यास तो केवळ एका झाडाला नसून संपूर्ण परिसरातील जैवविविधतेला नष्ट करतो त्यामुळे निसर्ग वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने 'दक्षतादूत' म्हणून काम करावे, असे सांगतानाच वणव्याची कोणतीही घटना निदर्शनास आल्यास तातडीने स्थानिक वन विभाग, नगरपंचायत, ग्रामपंचायतीला माहिती देण्याचे आवाहनही डॉ. कुंटेवाड यांच्याकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
Exit mobile version