धाटावच्या ग्रामसभेकडे नागरिकांनी फिरवली पाठ

| धाटाव | प्रतिनिधी |

सर्वसामान्य नागरिकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती मिळत असते. त्यामुळे ग्रामस्थ व विकासकामे यामध्ये दुवा हा ग्रामपंचायत असतो. गावचा कारभार पाहण्याकरता ग्रामपंचायतीची निर्मिती केलेली आहे. असे असताना रायगड जिल्ह्यात नावलौकिक असलेल्या धाटाव ग्रामपंचायतमध्ये तेथील नागरिकांचा व महिला वर्गांचा ग्रामसभेचा निरुत्साह पाहता ग्रामसभेला नागरिकांनी पाठ फिरवल्याचे गणसंख्येअभावी ग्रामसभा तहकुबीवरून दिसून आले.

धाटाव ग्रामपंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा शुक्रवारी (दि.29) सकाळी 11 वाजता धाटाव ग्रामपंचायतचे प्रशासक एम.जी.फडतरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत मागील सभेच्या इतिवृत्त वाचनाबरोबरच सन 2026-27 या वित्तीय वर्षाचा ग्रामनिधी व पाणीपुरवठा कर मागणी कायम करण्याबाबत, तर 2025-26 चा पंचायत वार्षिक जमा खर्च वाचून मंजूर करणे व 2025-26 आर्थिक वर्षात अंदाजपत्रकीय जादा खर्चास मंजूर देणे, त्याचप्रमाणे अध्यक्षांच्या परवानगीने येणारी आयत्या वेळची कामे अशा महत्वाच्या विषयावर चर्चा, निर्णय घेण्यात येणार होते. मात्र ग्रामपंचायतीमध्ये पद भूषविलेल्या आजी माजीपैकी एकाही सरपंच, उपसरपंच सदस्याने उपस्थिती दर्शविली नसल्याने त्यातच बहुतांशी नागरिकांनी सुद्धा अक्षरश: पाठ फिरविल्यामुळे अपुऱ्या गणसंख्ये अभावी ग्रामसेवक अमोल तांबडे यांना ग्रामसभा तहकूब करावी लागली.

Exit mobile version