थंड पेयांना मागणी वाढली; फळांनाही आला भाव
। अलिबाग । दिव्या तानवडे ।
गेल्या आठवडाभरापासून अलिबाग शहर आणि परिसरातील तापमान कमालीचे वाढल्याने सारेच हैराण झाल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शरीराला गारवा मिळावा म्हणून आता थंड पेयांना मागणी वाढली आहे. तर, आरोग्यपूरक फळांनाही आता चांगला भाव आलेला आहे.
मार्च संपत असतानाच आलेल्या उष्माच्या लाटेचा परिणाम अलिबागकरांवरही चांगलाच झाला आहे. पहाटेच्यावेळी हवेत गारवा आणि भरदुपारी लाहीलाही करणारे उन्ह असे विचित्र हवामान सध्या शहरवासीय अनुभवत आहेत. त्यामुळे दुपारच्यावेळी शहर आणि परिसरात कमालीचा शुकशुकाट जाणवत असतो. उन्हाच्या तडाख्याने नागरिकही सकाळी जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करताना, तर संध्याकाळी समुद्रकिनार्यांवर फिरताना दिसतात.

अलिबागसह कोकणात यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक तीव्र जाणवू लागला आहे.तसा अंदाजही हवामान खात्याने वर्तविलेला आहे. यामुळे ऐन उन्हात कोरड पडलेल्या घशाला ओलावा मिळावा म्हणून थंड पेयांना मागणी वाढली आहे. ठिकठिकाणी गल्लोगल्लीत बर्फाचे गोळे विक्रेते फिरताना दिसत आहेत. पंधरा ते वीस रुपयांपर्यंत हे रंगीबेरंगी बर्फ गोळे विकले जात आहेत. याशिवाय आईस्क्रिम, कुल्फी, थंड पेये यानाही मागणी वाढली आहे. बाजारात लिंबांनाही चांगला भाव आलेला आहे. याशिवाय थंडगार सब्जाही विकला जात आहे. रात्रीच्यावेळी खास आईस्क्रिम खाण्यासाठी नागरिक सहकुटुंब फिरताना दिसत आहेत.सध्या कोरोनाचे निर्बंध नसल्याने आईस्क्रिम पार्ट्यांना सर्वजण पसंती देताना दिसत आहेत.त्यामुळे आईस्क्रिम दुकानदारही चांगलेच फार्मात आलेले आहेत.

फळांना मागणी वाढली
बाजारात फेरफटका मारला तर ठिकठिकाणी द्राक्षे, कलिंगडे यांनाही ग्राहकांची पसंती मिळू लागलेली आहे. द्राक्षे 70 ते 80 रुपये किलोने विकली जात आहेत. तर, कलिंगडेही किमान 50 रुपयांपासून विकली जात आहेत. रसवंतीगृहातही गर्दी झाल्याचे जाणवत आहे. बाजारात सफरचंद, पेरु, डाळिंब या फळांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. तर, टरबूजाची आवक सुरू झाली असून, त्यांच्या किमती आवाक्यात असल्याने ग्राहकांची या फळांना मागणीदेखील वाढली आहे.सध्या सफरचंदाचे सर्वांत जास्त प्रकार बाजारामध्ये उपलब्ध असून, त्यामध्ये काश्मिरी, इराण अशा विविध प्रकारातील सफरचंदाच्या किमती वाढल्या. एक किलो सफरचंदासाठी 100 ते 280 रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. याशिवाय लाल पेरु 260 रुपये किलो, साधे पेरु 160 रुपये किलो तर साऊथ आफ्रिकन पेरची किंमत 240 रुपये किलो आहे.
मागील कोरोनाच्या दोन वर्षात मालाची विक्री झाली नव्हती. पण, आता जसा उन्हाळा वाढला, तसे आईस्क्रिम, ज्यूस आदी वस्तूंची विक्री वाढली आहे व त्यातून उत्पन्न वाढले आहे. – जय संतोषी माँ, बंटी आईस्क्रिम सेंटर