हातगाडयांना नगरपरिषदेचा दणका

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग समुद्रकिनारी वर्दळीच्या ठिकाणी हातगाडीद्वारे व्यवसाय करणार्‍यांवर अलिबाग नगरपरिषदेने दणका दिला आहे. नगरपरिषद व अलिबाग पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या शुक्रवारी कारवाई केली.

अलिबाग समुद्रकिनार्‍याला पर्यटकांकडून पसंती दिली जात आहे. समुद्रकिनारी पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. सुट्टीच्या हंगामात पर्यटकांची समुद्रकिनारी वर्दळ वाढली आहे. त्यात पर्यटक समुद्रातील पाण्यात भिजण्याचा आनंद मनमुरादपणे घेत आहेत. मात्र समुद्रकिनारी वर्दळीच्या ठिकाणी काही हातगाडी चालकांनी खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय सुुरू केला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरपरिषदेने या व्यवसायिकांवर कारवाई करण्यास सुुरूवात केली आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक अंगाई साळुंखे व अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तरित्या कारवाई शुक्रवारी करण्यात आली. समुद्रकिनारी थाटलेल्या खाद्य पदार्थ विक्रेत्यावर कारवाई यावेळी करण्यात आली. पर्यटकांच्या सुरक्षेबरोबरच किनार्‍यावरील स्वच्छतेसाठी ही कारवाई केली असल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली.

समुद्रकिनारी होणार्‍या या कारवाईबाबत काहींकडून समाधान व्यक्त केले जात असताना काहींकडून नाराजीदेखील व्यक्त केली जात आहे. धुमस्टाईलने समुद्रकिनारी फिरविणार्‍या बाईक पादचार्‍यांसाठी डोकेदुखी बनत आहे. अनेक वेळा सकाळच्यावेळेला पादचार्‍यांना या बाईकच्या कर्णकर्कश आवाजामुळे प्रचंड त्रास होतो. त्याकडे मात्र प्रशासन व पोलीस यंत्रणा दुर्लक्ष का करीत आहे, असा सवालदेखील अनेकांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version