शेकापच्या दणक्याने सिव्हिल प्रशासन वठणीवर

चित्रलेखा पाटील यांची प्रशासनाबरोबर मध्यस्थी
परीक्षार्थींचे अर्ज स्वीकारण्यास पाडले भाग
। अलिबाग । वार्ताहर ।
महावितरणच्या नोकर भरतीसाठी आलेल्या परीक्षार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याबरोबरच अर्ज स्वीकारण्यास अडवणूक करणार्‍या जिल्हा रुग्णालय प्रशासनाला शेकापने जोरदार दणका देत वठणीवर आणले. शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करुन परीक्षार्थीचे अर्ज स्वीकारण्यास व वैद्यकीय चाचणी घेण्यास भाग पाडले आहे. सध्या सुरू असलेल्या महावितरण भरतीसाठी संपूर्ण जिल्ह्यामधून सर्व परीक्षार्थी वैद्यकीय चाचणीसाठी अलिबाग शासकीय रुग्णालयात येत आहेत. परंतु, त्यांची वैद्यकीय तपासणी घेण्याबरोबरच अर्ज स्वीकारण्यास जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासन अडवणूक करत होते. ही बाब कळताच क्षणाचाही विचार न करता कायम लोकसेवेसाठी तत्परतेने धावून जाणार्‍या शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी आपले सहकारी पुरोगामी युवक संघटना सदस्य आस्वाद घरत, नगरसेवक अनिल चोपडा यांच्यासह अलिबाग जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी परीक्षार्थींशी बोलून त्यांना येणार्‍या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून भरतीसाठी आलेल्या परीक्षार्थ्यांना दिल्या जाणार्‍या चुकीच्या वागणुकीची आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या मनमानी कारभाराची शेकापने चांगलीच कानपिळणी केली आहे. यावेळी चित्रलेखा पाटील यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करुन परीक्षार्थींना मिळणार्‍या वागणुकीबद्दल खडे बोल सुनावले. चित्रलेखा पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे रुग्णालय प्रशासन नरमले असून, विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे आणि त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे मान्य केले आहे. राहायला आणि खायला पैसे नसताना व जिल्हा रुग्णालय प्रशासन अशी वागणूक देत असताना, संकटात अडकलेल्या परीक्षार्थ्यांना शेकापने मदत केली. या सर्व परीक्षार्थींनी शेतकरी कामगार पक्ष आणि चित्रलेखा पाटील यांनी केलेल्या मदतीमुळे त्यांचे आभारदेखील मानले आहेत.

Exit mobile version