लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारहाण
| नेरळ | प्रतिनिधी |
जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर पत्रे बसवण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. त्यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी नेरळ पोलिस ठाण्याच्या कळंब आऊट पोस्ट पोलिसात 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाथरज ग्रामपंचायतीमधील मोरेवाडी येथे रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यावेळी तेथे काही व्यक्ती जमल्या आणि त्यांनी शाळेचे काम चांगले करा, अशी सूचना केली. त्याचा राग धरून मोरेवाडीमधील सहा व्यक्ती त्या ठिकाणी दाखल झाल्या. दोन्ही गटात आधी शाब्दिक बाचाबाची झाली. बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीमध्ये झाले. हाणामारीत लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आला. चांगु कमळू पादीर, हरिचंद्र रामा निरगुडा, परशुराम कान्हू पादीर, तुकाराम कान्हू पादीर आणि मंगलीबाई परशुराम पादीर हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.