दशक्रिया व उत्तरकार्य न करता रक्कम दान
| पाली/बेणसे | वार्ताहर |
श्रीवर्धन भैरवनाथ पाखाडीतील रहिवासी अनंत दवटे यांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. त्याचबरोबर पारंपरिक चालीरीती आणि कर्मकांडांना फाटा देण्यात आला आहे. शिवाय दशक्रिया व उत्तरकार्य न करता यातून वाचलेली रक्कम अनाथ आश्रमाला दान करण्यात आली आहे.
दवटे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी ठाणे येथे बुधवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ठाण्यातील पुरवठा विभागात शिधावाटप अधिकारी म्हणून ते 2004 साली निवृत्त झाले. आपल्या आजारपणाच्या काही वर्ष आधी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प त्यांनी केला होता. यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता देखील केली होती. मरणोत्तर कोणत्याही दशक्रिया किंवा बाराव्याचा विधी न करता वाचलेली रक्कम अनाथ आश्रमाला दान करण्याची सूचना त्यांनी आपल्या मुलांना केली होती. तीर्थक्षेत्र हरेश्वर येथे अस्ती विसर्जन करून सुतकातून मुक्त होऊन दैनंदिन व्यवहाराला सुरुवात करण्यास आपल्या कुटुंबियांना सांगितले होते. त्याचबरोबर पत्नीच्या आधी मृत्यू आल्यास तिचे सौभाग्यलेणे न उतरवता तिला सन्मानपूर्वक वागणूक द्यावी अशी इच्छा व्यक्त केली होती.यासाठी त्यांनी कायदेशीर आधार घेतला होता.
वयाच्या 75 वर्षी जवळच्या नातेवाईकांसमोर त्यांनी इच्छापत्र वाचून दाखवले होते. पुरोगामी संकल्पांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कृतिशील रूप दिले. मुलाबरोबर मुलीनेही वडिलांना खांदा देत अग्निसंस्कार केले. वडिलांच्या पुरोगामी विचारांची बांधिलकी जपणारे दवटे कुटुंबीय सर्व समाजासाठी अनुकरणीय ठरले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी अजिता, मुलगा अनिकेत, सून अक्षता नातवंडे ऋजुला, जेसिका, साईश, मुलगी अपर्णा व आरती, जावई, यांचा समावेश आहे.
नेत्रदानाचा निर्णय कठोर असला तरी ती एक सामाजिक बांधिलकी आहे. याबाबत प्रत्येकाने आत्मचिंतन करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करावा. कर्मकांडावर होणारा खर्च विधायक कामांसाठी द्यावा.
आरती नाईक
मुलगी तथा अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्यवाह