| नवी मुंबई | प्रतिनिधी |
आजपासून राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. त्याआधीच नवी मुंबईत दुर्दैवी घटना घडली आहे. नवी मुंबईतील तुर्भे नाका येथे डंपरच्या धडकेत दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. दिपांशु बौद्ध (15) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मित्रासोबत सायकलने दहावीच्या हॉल तिकीटचे प्रिंटआऊट काढायला जात असताना अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, तुर्भे एमआयडीसीतील इंदिरा नगरमध्ये राहणारा दिपांशुची शुक्रवारपासून दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरु होणार होती. इंदिरानगर येथून हॉल तिकिटाचे प्रिंटआऊट काढण्यासाठी गुरुवारी (दि.20) दिपांशु सायकलवर तुर्भे नाका येथे जात होता. त्याचा मित्र अल्ताफही त्याच्यासोबत होता. फायजर रोडवरून जाताना अमित पॅलेस बारसमोर पाठीमागून भरधाव आलेल्या डंपरने त्याला धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या दिपांशुला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक फरार झाला होता. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले. डंपर चालकाविरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.