| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील नेरूळ येथे आज शुक्रवारी (दि.21) चिंचोली तलावातील पाण्यावर एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मृत महिलेचे वय अंदाजे 30ते 35 वर्षे आहे. या महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, याबाबतचा तपास पोलीस करत आहेत.
नवी मुंबईत नेरूळजवळ महापालिकेचे चिंचोली शिरवणे तलाव आहे. या तलावात एका महिलेचा मृतदेह आढळला. तलावात पाण्यावर महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. तिचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांसह महापालिका प्रशासनातील कर्मचारी-अधिकारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात तो विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.