| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील एका तरुणाची रेल्वेतील सरकारी नोकरी लावण्याच्या बहाण्याने तब्बल 19 लाख 42 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. पनवेल शहरातील वडाळे तलावाशेजारील नंदनवन कॉम्प्लेक्समध्ये राहणार्या 40 वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार पाच महिन्यांपूर्वी एका भामट्याने फोनवरुन संपर्क केला. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी ऑफर लेटर दिल्यावर वेळीच उमेदवाराने कागदपत्र न दिल्यास हे ऑफरलेटर रद्द करण्याची भीती घातली. तसेच विविध कागदपत्रे बनविण्यासाठी पैसे उकळले. या कागदपत्रांमध्ये वैद्याकीय प्रमाणपत्र, प्राप्तीकराचा दाखला, कुटूंब सदस्यांबाबतचे शपथपत्र अशी कागदपत्रे मागितली. ही फसवणूक दोन भामट्यांनी मिळून केली. दोन भामट्यांनी बँकेच्या खात्यामधून फसवणुकीची रक्कम स्वीकारली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.