अधिकार्यांनी फिरवली पाठ
| पेण | प्रतिनिधी |
सेझ विरुद्ध 24 गाव संयुक्त कृती समितीमार्फत गेल पाईपलाईन विरूद्ध उपविभागीय अधिकारी कार्यालय, पेण येथे शेतकर्यांकडून उपोषण करण्यात आले. मात्र, शेतकर्यांच्या भावनांना पायदळी तुडवत अधिकार्यांनी अक्षरशः शेतकर्यांचा अपमान केला आहे.
गेल वायू वाहिनीसाठी शेतकर्यांच्या जमिनीतून शासन सक्तीने संपादन करू पाहात आहे. मात्र, शेतकर्यांनी या गेलच्या वायू पाईपलाईनला विरोध केला असून, सदर पाईपलाईन ही खाडीच्या बाजूने न्यावी जेणे करून भविष्यात शेतकर्याला त्याचा दुष्परिणाम भोगावे लागणार नाही, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. परंतु, गेल कंपनी प्रशासन आणि अधिकारी ठस की मस व्हायला तयार नाहीत. कित्येक वेळी उपविभागीय कार्यालयात याबाबत बैठका झाल्या. या बैठकांमध्ये आश्वासनापलीकडे शेतकर्यांच्या पदरी काहीच पडले नाही.
आज प्रांत कार्यालय येथे शेतकर्यांनी एक दिवसाच्या उपोषणाची तयारी दर्शवत शेकडो शेतकरी उपोषणाला बसले आहेत. मात्र, गेंड्याच्या कातडीच्या अधिकार्यांनी याकडे दुर्लक्ष करत बांधकाममंत्र्यांचे स्वागत करण्यात धन्यता मानली. शेतकरी बिचारे उन्हात बसून सरकारचे प्रतिनिधी, अधिकारी भेटण्यास येतील या भाबड्या आशेवर बसले होते. मात्र, दुपारचे तीन वाजले तरी अधिकारी फिरकलेदेखील नाही. या उपोषणकर्त्यांमध्ये जि.प. सदस्य, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी हजर होते.