जिल्हा प्रशासन सज्ज; 18 मार्चपर्यंत परीक्षा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा मंगळवार (दि.10) फेब्रुवारीपासून सुरू झाली असून, जिल्ह्यात परीक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्याच दिवशी 33 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाचा पेपर दिला. परीक्षा पारदर्शक व कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत.
मंगळवारपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्य शाखेतील एकूण 33 हजार 121 विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत इंग्रजी विषयाचा पेपर शांततेत पार पडला. कोणताही गैरप्रकार घडला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात एकूण 52 परीक्षा केंद्रांवर या परीक्षा सुरू आहेत. बुधवारी (दि.11) हिंदी विषयाचा पेपर सकाळी 11 ते 2 या वेळेत होणार आहे, तर गुरुवारी (दि.12) मराठी विषयाचा पेपर होणार आहे. हा परीक्षेचा हंगाम 18 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नयेत यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची कसून तपासणी केली जात आहे. मुलींच्या तपासणीसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्रांवर व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी नऊ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये विभागीय, जिल्हास्तरीय पथके, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी योजना, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक तसेच विशेष महिला भरारी पथकांचा समावेश आहे. याशिवाय तालुका स्तरावर प्रत्येकी एक अशा 15 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून
बारावीच्या परीक्षेनंतर आता दहावीच्या परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, त्यासाठी अवघे आठ दिवस शिल्लक आहेत. जिल्ह्यातील 37 हजार 579 विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. यासाठी 75 परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आली आहे.परीक्षेदरम्यान कॉपी किंवा इतर गैरप्रकार होऊ नयेत यासाठी शाळा व महाविद्यालयांमधील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडूनही वेळोवेळी सूचना देऊन कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
परीक्षेसाठी प्रचंड मेहनत
दहावी आणि बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक आणि करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही परीक्षेची चिंता वाटत आहे. काही पालकांनी मुलांच्या अभ्यासासाठी कार्यालयातून सुट्टी घेतली आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे यासाठी पालक आणि शिक्षक मोठ्या प्रमाणात मेहनत घेत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.









