50 केंद्रांमध्ये 31 हजार 943 विद्यार्थी बसणार; गैरप्रकार रोखण्यासाठी पाच भरारी पथके सज्ज
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीची परीक्षा मंगळवारी 11 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. एकूण 50 केंद्रांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्य शाखेतील 31 हजार 943 विद्यार्थी व विद्यार्थिनी परीक्षेस बसणार आहेत. परीक्षेच्या कालावधीत कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून पाच भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यात पेण व म्हसळ्यामध्ये दोन ठिकाणी संवेदनशील केंद्र आहेत. ही परीक्षा 18 मार्चपर्यंत असणार असल्याची माहिती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
बारावीची परीक्षा कधी सुरू होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून राहिले होते. परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकांसह पालकांनी प्रचंड मेहनत घेतली. विद्यार्थ्यांनीदेखील या परीक्षेची तयारी गेल्या वर्षभरापासूनच सुरू केली. अखेर तो दिवस उजाडला आहे. बारावीची परीक्षा मंगळवारपासून (दि.11) सुरु होणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी अकरा ते दोन या वेळेत इंग्रजी विषयाचा पेपर असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. मंगळवारपासून सुरु होणार्या परीक्षेसाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत. आपले आसन क्रमांक पाहण्यासाठी जिल्ह्यातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी होताना दिसून येत आहे. परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी पाच भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, बैठे पथक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, विशेष महिला भरारी पथक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक या पथकांचा समावेश आहे.
यावर्षी बारावीच्या परीक्षेला 31 हजार 817 विद्यार्थी बसणार आहेत. गतवर्षी 31 हजार 943 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी परीक्षेला 126 विद्यार्थी कमी आहेत. तसेच गतवर्षी 49 केंद्रे होते. यावर्षी 50 केंद्रे आहेत. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेने केंद्रामध्ये यंदा एकने वाढ झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
परीक्षा केंद्रांवर राहणार नजर
परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांची कार्यशाळा घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समिती गठीत करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या 50 मीटरच्या आत अनधिकृत प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेला येणार्या प्रत्येक विद्यार्थ्यांची झडती घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर मुलींच्या कॉपी तपासणीसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस व शाळेच्या महिला कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर व्हीडीओ रेकॉर्डिंग करण्याच्या सूचना केंद्र संचालकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तदेखील ठेवण्यात येणार आहे.
बारावीची परीक्षा मंगळवारी 11 फेब्रुवारीपासून होत आहे. त्यासंदर्भात परीक्षण कार्यालय अलिबागध्ये करण्यात आले असून, अलिबागमध्ये बारावीचे सहा केंद्र आहेत. केंद्रामध्ये विद्यार्थ्यांकडून कॉपी प्रकार घडू नये, यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
कृष्णा पिंगळा,
गट शिक्षणाधिकारी