। नागपूर । प्रतिनिधी ।
नागपूरमधून एक अतिशय भयंकर घटना समोर आली आहे. शाळेजवळ असलेल्या दुकानाचे शटर दुरुस्त करण्यासाठी आलेल्या एका तरूणाने शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याने 1-2 नाही तर तब्बल 17 शाळकरी मुलींशी ही अश्लील वर्तणूक केल्याचेही उघड झाले आहे. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या. रवि लाखे (32) असे आरोपीचे नाव आहे.
ही घटना नागपूरातील नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. तेथील परिसरात एक नामांकित शाळा आहे, त्याच शाळेच्या बाजूला स्टेशनरीचे एक दुकान आहे. त्या दुकानाचे शट नादुरूस्त झाले होते, त्यामुळे दुकानमालकाने त्याच्या दुरूस्तीसाठी आरोपी लाखे याला बोलावलं होतं. शनिवारी दुपारी तो त्या दुकानाचं काम करण्यासाठी आला होता. मात्र, त्याची मानसिकता विकृत असून तो काम सोडून जवळच असलेल्या शाळेच्या गेटजवळ उभा राहिला आणि येणार्या जाणार्या मुलींकडे वाईट नजरेने पहात होता.
तेथील एका पालकाने त्याला हटकल्यानंतर तो तेथून दूर गेला आणि दुकानात कामासाठी परतला. स्टेशनरी दुकान उघड असल्याचे पाहून काही मुली दुकानात आल्या आणि काही वस्तू मागितल्या. यावेळी दुकानाचा मूळ मालक, दुकानदार तेथे नव्हता. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने त्या मुलींना आत बोलावून त्यांच्याशी अश्लील चाळे करू लागला. काही मुलींनी घाबरुन तेथून पळ काढला. जवळपास दोन तासांच्या वेळेत 17 मुली त्या दुकानात आल्या. आरोपीने त्यांना बिस्कीट-चॉकलेटचे आमिष दाखवत आत बोलावले आणि नको ते चाळे केले.
मात्र, पीडित मुलींपैकी दोघींनी हिंमत गोळा केली आणि शाळेत घेण्यासाठी त्यांचे पालक आल्यावर घडलेला हा सगळा प्रकार त्यांना सांगितला. मुलींकडून ही माहिती मिळताच पालकांनी तात्काळ नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनीही तातडीने गुन्हा दाखल करत त्या दुकानात जाऊन आरोपी रवि याला बेड्या ठोकून अटक केली. मात्र, या घटनेमुळे शाळकरी मुला-मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.