| रोहा |सत्यप्रसाद आढाव /विश्वास निकम |
रोहा तालुक्यात रविवारी (दि.10) रोहा येथे शेकाप सरचिटिणीस जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, सुप्रिया पाटील, खजिनदार अतुल म्हात्रे, महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, नेते शंकरराव म्हसकर, मारुती खांडेकर, शिवराम महाबले यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या आयोजित मेळाव्यात रोह्यातील असंख्य कार्यकर्ते पाहून जयंत पाटील अक्षरशः भारावून गेले होते. त्यामुळे पुन्हा त्या काळातील आठवणींना उजाळा देत टोलेबाजीचा प्रहार केला. ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली, ज्यांना पक्षाने मोठे केले, काही पक्ष सोडून गेले, काही विसरले अशांना गाडण्यासाठीच जिल्ह्यात तसेच तालुका स्थरावर कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. येत्या काळात त्यांना गाडण्यासाठी सज्ज व्हा. जी चूक माझ्याकडून झाली ती पुन्हा होणार नाही, अशी दिलगिरी कार्यकर्त्यांसमवेत व्यक्त करत जयंत पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
रोहा येथील संवाद मेळाव्यात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ज्यांनी आम्हाला आताच्या निवडणुकीत पाडले त्यांना पाडून त्यांची जागा दाखवून देऊ. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत जिल्हा परिषद आपल्या हातून कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे पुन्हा ताकतीने पक्षाची वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पक्षासाठी काम करण्यासाठी नव्या पिढीला, तसेच महिलांना अधिकाअधिक संधी दिली पाहिजे. पक्षात नवे बदल करण्यात येतील, माझा तुमच्यावर विस्वास आहे. आजही शेकापची ताकद रोहा येथे दिसून आल्याचा आनंद जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच, पक्षात बदल घडवून आणायचा असेल तर तरुण महिलांना प्राधान्य देत जबाबदारी दिली पाहिजे, असे प्रतिपादन देखील जयंत पाटील यांनी केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी दिली ते रायगड जिल्हा चिटणीस सुरेश खैरे हे पक्षाचे उत्तम काम करत युवा पिढीशी संवाद साधत आहेत. त्याचबरोबर महीला म्हणून ॲड. मानसी म्हात्रे व चित्रलेखा पाटील या युवती आणि महीलांशी संवाद साधून नवी दिशा देण्याचे काम करत आहेत. आपण निवडणूकीत हरलो म्हणून खचलो होतो. परंतु, खचून जाऊ नका, पुन्हा जोमाने पक्ष उभा करू. मी सदैव प्रयत्नशील आहे, असा विश्वास आणि आधार कार्यकर्त्यांना जयंत पाटील यांनी दिला आहे.
यावेळी शंकरराव म्हसकर म्हणाले की, शेकापचा कार्यकर्ता हा सक्षम कार्यकर्ता आहे. कुंभाराने बनविलेल्या मडक्यात चुकून एखादे मडके कच्चे असते आणि ते फुटते. तसेच काहीसे आता झाले आहे. परंतु, आपण त्यात बदल करून उत्तम प्रकारची मडकी घडविण्याचे काम पुन्हा करूया. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडणुकित लाल बावटा नक्कीच फडकेल, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. दरम्यान, तांबडी येथील उद्योजक विठोबा सितप, कार्यकर्ते वाईकरसह अनेक कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेकापमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.
सुरेश खैरे यांची बांधणी आज जिल्ह्यातील उरण, पेण, सुधागड पाली पाठोपाठ रोहा येथे पाहायला मिळाली. पक्षाला खंबीर नेतृत्व सुरेश खैरे आणि अतुल म्हात्रे यांचे आहे. जे गेले त्यांनी बीजेपीच्या माध्यमातून कुठलीही गंगा आणली नाही. गंगा शेकापने आणली. सरचिटणीस जयंत पाटील यांचे सच्चे आणि निष्ठावंत कार्यकर्ते आज सावांद मेळाव्यातून पाहायला मिळत असल्याचा आनंद आहे. महिलांनो अधिक सक्षम व्हा, आता अधिक जोमाने काम करायचे आहे.
ॲड. मानसी म्हात्रे, राज्य महिला आघाडी प्रमुख, शेकाप
रायगडमध्ये पक्षाचा संवाद मेळावा सुरु आहे. नुकत्याच निवडणूका पार पडल्या. त्यानंतर लोकांची मनं खचली होती. पण खचून जाऊ नका.आज पडलो असलो तरी शेकापच्या मतांचा आकडा कायम आहे. तालुक्यात पैसेवाले जरी असले तरी कार्यकर्ते जागेवर आहेत. पक्षाची फळी मजबूत आहे. सामाजिक चळवळीतून आपल्या पक्षाची ओळख आहे. येणाऱ्या काळात तिसरी मुंबई म्हणुन घोषीत करण्यात येत आहे. त्यामुळे या तालुक्यात पुढच्या काळात आमचा भूमिपुत्र हाच व्यावसायिक बनेल. त्याला उत्तम दर्जाच्या रोजगाराचे काम यावर प्रयत्न केले जातील. त्यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी पुढे येणे आवश्यक आहे.
अतुल म्हात्रे, खजिनदार, शेकाप