रायगड जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची भोपाळ येथे शैक्षणिक सहल
| रायगड | खास प्रतिनिधी |
राष्ट्रीय आविष्कार अभियानांर्तगत राज्याबाहेर शैक्षणिक अभ्यास सहलीचे आयोजन मध्यप्रदेश, भोपाळ येथील प्रादेशिक विज्ञान भवन येथे नुकतेच करण्यात आले होते. या सहलीसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या सहा शाळांची निवड करण्यात आली होती. या शाळांमधील 45 विद्यार्थी सहलीत सहभागी झाले होते. रायगड जिल्हा परिषद, 2024-25 केंद्रीय प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनीता गुरव यांनी व्हिडीओ कॉल करून विद्यार्थ्यांशी संवाद साधत सहलीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय आविष्कार अभियान राज्याबाहेर शैक्षणिक अभ्यास सहलीत मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात जिल्ह्यात प्रथम व विभागात द्वितीय पुरस्कार प्राप्त रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वडगाव खालापूरचे आठ विद्यार्थी, उच्च प्राथमिक शाळा तळोदे पाचनंद पनवेलचे चार विद्यार्थी, उच्च प्राथमिक शाळा, खारपाडा पेणचे सहा विद्यार्थी, उच्च प्राथमिक शाळा, खोपटे उरणचे आठ विद्यार्थी, वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यामंदिर माथेरानचे 13 विद्यार्थी, शासकीय आश्रमशाळा पिंगळस कर्जतचे सहा असे एकूण 45 विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच वडगाव शाळेचे मुख्याध्यापक सुभाष राठोड यांची या सहलीसाठी नोडल अधिकारी म्हणून, तर पेणच्या सुषमा धुर्वे यांची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती जिल्हा परिषदेकडून करण्यात आली होती. त्यांच्यासोबत संतोष चाटसे, नंदिनी कदम, विभावरी सिंगासने, अमृता तोडकर, सीमा डोंगरे यांची या सहलीसाठी निवड करण्यात आली होती.
सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना प्रादेशिक विज्ञान केंद्र, भोपाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय, आदिवासी जनजाती म्युझियम, वनविहार प्राणीसंग्रहालय, नौकानयन, राजा भोज तलाव, जगप्रसिद्ध ताज उल मस्जिद, मोती मस्जिद, कर्करेषा, सांची स्तूप, पीपल्स मॉल व भीमबेटका इतक्या स्थळांची भेट व अभ्यास करण्याची संधी मिळाली. प्रादेशिक विज्ञान भवनात तारामण्डल रचना, निर्मिती यावर शो दाखवण्यात आला. प्रेक्षणीय स्थळे व पर्यटनाचा आनंद मुलांनी लुटला.