पोलादपुरातील संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
। पोलादपूर । शैलेश पालकर ।
भारतीय जनता पक्षाने जेव्हा-जेव्हा विविध पक्षांची मदत घेतली, तेव्हा अन्य पक्षांची ताकद संपविण्याचे काम केले आहे. भाजप हा बहुजन समाजाचा पक्ष नाही. शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांना तेथे सुरुवातीला मोकळा श्वास घेता आला तरी पुढे मात्र गुदमरल्यासारखे होईल, असा सूचित इशारा सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिला आहे. पोलादपुरातील मोरगिरी येथे सोमवारी (दि.10) संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शेकापक्ष संपल्याच्या कितीही हाकाट्या द्या, शेकापक्षाला राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा भरारी घ्यायचे माहिती आहे. शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या, काँग्रेसमधून फुटलेल्या राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या. तसे शेकापक्षाचे दोन शेकापक्ष होणार नाहीत. हे भाजप आणि अन्य पक्षात जाऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे. शेकापक्षाच्या पक्षबदलूंसोबत मतदार जनाधार नसेल. पोलादपूरमधून शेकापक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती निवडून आणण्याचे काम या पिढीने केले आहे. म्हणून या संवाद मेळाव्याचा शेवट पोलादपूरमध्येच मोठ्या संवाद मेळाव्यामध्ये होईल. यासाठी भाषण राखून ठेवतोय, असा गर्भित इशारा सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिला आहे.
यावेळी व्यासपीठावर माजी आ. बाळाराम पाटील, पक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे, महाराष्ट्र कामगार आघाडीप्रमुख प्रदीप नाईक, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, महिला आघाडीप्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, माजी राजिप अध्यक्षा सुप्रिया पाटील, राजिमस बँकेचे संचालक एकनाथ गायकवाड, मोरगिरीचे माजी सरपंच जगन्नाथ वाडकर, सरपंच शरद जाधव, तालुका चिटणीस वैभव चांदे, समीर चिपळूणकर, मधुकर जाधव, मनोहर पार्टे, बापू जाधव तसेच शेकापक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मोरगिरी येथील स्व. प्रभाकर पाटील सभागृहामध्ये आयोजित संवाद मेळाव्याप्रसंगी बोलताना शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी, भाजपच्या सोशल मीडियावर डॉ. आंबेडकर ब्राह्मण सांगितले जातात. रायगडावरील ज्योतिबा फुले यांनी शोधलेल्या शिवसमाधीचा सोहळा कोणी चालवला आहे हे लक्षात घ्यायचे आहे. जयप्रकाश नारायण यांनी तरूण सुशिक्षितांना राजकारणात येण्याचे आवाहन केल्यानंतर तयार झालेल्या काँग्रेसविरोधी पक्षांची मोट बांधली गेली होती. जनसंघाकडून गांधीनगरमधून निवडणूक लढणाऱ्या आडवणींनी भारतीय जनता पक्षाच्या निर्मितीचे काम केले तेव्हा सोबतच्या पक्षांची ताकद संपवून टाकल्याचा घणाघात केला आहे.
ते म्हणाले की, पोलादपूरमधील उमरठमध्ये स्व. प्रभाकर पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आणले आणि चार दिवसांमध्ये रस्ता तयार केला होता. कुडपण येथे सर्वसाधारण सभा आयोजित करून कुडपणला सर्व अधिकारी वर्गाला चालत नेले. आता दोन्ही ठिकाणच्या रस्त्यांच्या कामाचे काय चाललंय, तालुक्यामध्ये काय सुरू आहे, मी आता बोलणार नाही. संवाद मेळाव्याच्या सांगता मेळाव्यात पोलादपूरमध्येच बोलेन, अशी कणखरपणे भूमिका मांडली. शेकापक्षाला सोबत घेतल्याशिवाय कोणत्याही पक्षाला रायगड जिल्हा परिषदेमध्ये अथवा तालुक्यांच्या पंचायत समित्यांमध्ये यश मिळणार नाही, असे भाई जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
देशाच्या, राज्याच्या, कोकणाच्या आणि जिल्ह्यासह पोलादपूर तालुक्याच्या राजकीय विश्लेषणाद्वारे जयंत पाटील यांचे भाषण अभ्यासपूर्ण व प्रभावी ठरले. याप्रसंगी जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी, मध्यंतरीच्या काळामध्ये शेकापक्षाचा कार्यकर्त्यांसोबत संवाद राहिला नव्हता ही खरी बाब असून, त्यामुळेच शेकापक्षाचे कार्यकर्ते पोलादपूरच्या नरवीर तानाजी मालुसरेंसारखे होते. कधीही निष्ठा न विकणारे कार्यकर्ते आता इतरांच्या गळाला लागत आहेत, असे खेदाने मान्य करीत लवकरच शेकापक्षाच्या कार्यकारिण्या व पदाधिकारी यांच्यासह सक्रीय कार्यकर्ते व तरूण मतदारांसोबत सुसंवाद साधण्याची परिस्थिती निर्माण करण्यासाठी स्वत: भाई जयंत पाटील यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये मतदार व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ॲड. मानसी म्हात्रे यांनी, पोलादपूर तालुक्यातील केवळ दहा महिला तरूणी दिल्यास पोलादपूरच्या प्रत्येक भागातील महिलांना विविध महिलांच्या योजनांचा लाभ तसेच शेकापक्षाच्या ध्येयधोरणांची माहिती करून देऊ, असा विश्वास व्यक्त केला आहे.