। नागोठणे । प्रतिनिधी ।
नागोठण्याजवळील वाकण पाली रस्त्यावरील वजरोली गावाच्या हद्दीत असलेल्या चार बंगला समोरील परिसरात अपघातात झाल्याची घटना घडली. हा अपघात नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी (दि. 17) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या अपघातात क्लिनरचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वजरोली गावाच्या हद्दीत असलेल्या चार बंगला समोरील परिसरात डंपर चालक त्याच्या ताब्यातील डंपर भरधाव वेगात, बेदरकारपणे, रस्त्याचे परिरस्थीतीकडे दुर्लक्ष करून चालवत घेऊन जात असताना चालकाचा डंपरवरील ताबा सुटल्याने डंपर रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर आदळला. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात डंपरचा क्लिनर सूर्यप्रकाश पटेल, रा. मध्यप्रदेश याचा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर डंपर चालक सविनय पटेल (21), सध्या रा. पेझारी ता. अलिबाग मूळ रा. मध्यप्रदेश हा जखमी झाल्याने त्याच्यावर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. याच डंपरमध्ये असलेली दुसरी जखमी व्यक्ती विरेनकुमार सिंग, रा. मध्यप्रदेश याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात क्लिनर याचे मरणास तसेच जखमी यांना लहानमोठ्या स्वरुपाच्या दुखापती होऊन स्वत: किरकोळ दुखापतीस तसेच डंपरचे नुकसानीस कारणीभुत ठरल्याने या प्रकरणी डंपर चालक सविनय पटेल यांच्या विरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास म.पो.ह. सरोजा सावंत या करीत आहेत.
भरधाव डंपर झाडाला धडकून क्लिनरचा मृत्यू ; दोघेजण जखमी
