नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान
| रायगड | प्रतिनिधी |
राष्ट्रपिता महात्मा गांधीं जयंती सेवा पंधरवाडा निमित्ताने स्वच्छता ही सेवा ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अलिबागसह तालुक्यातील विविध गावातील 56 ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून श्रीसदस्यांनी गावात जाणारे रस्ते, प्राथमिक शाळा, मंदीर, स्मशानभूमी, बाजारपेठ, समुद्रकिनारे चकाचक केले.
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यामध्ये सामाजिक जनजागृती, सर्व स्वच्छता अभियान, आरोग्य जनजागृती, आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे, स्टेमसेल शिबिरे, वृक्ष लागवड व संवर्धन, गांडूळ खत प्रकल्प, जनजागृती, जल व्यवस्थापन, सामाजिक अनिष्ट परंपरा निर्मुलन, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, साक्षरता अभियान, व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण, नोकरी विषयक मार्गदर्शन, पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत वनराई बंधारे, विहिरी, कूपनलिका, पुनर्जलभरण, शालेय शिक्षणासाठी शासकीय दाखले वाटप अभियान, नैसर्गिक आपत्ती मदत व्यवस्थापन, श्रवणयंत्र वाटप, दिव्यांग-मूकबधीर शाळा व्यवस्थापन, बालसंस्कार वर्ग, महिला स्वशक्तिकरण, सामाजिक कुप्रथा निर्मुलन आदी. विविध उपक्रम राबविले जातात.
महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व निरूपणकार डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज रविवार दि.1 रोजी संपूर्ण देशामध्ये त्याच बरोबर अलिबाग तालुक्यातील अलिबाग, कुरुळ, रेवदंडा-चौल, थळ, पोयनाड-पेझारी, हाशीवरे, चोंढी-सोगांव, झिराड, सारळ-रेवस आदी. विविध 56 ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये 1 लाख 11 हजार 617 चौ.मि. क्षेत्रात 105.80 कि.मी. रस्ता व 11 कि.मी. समुद्र किनाऱ्यावर एकूण 65.210 टन ओला व सुक्या कचरा गोळा करण्यात येऊन ठिकठिकाणच्या डंपिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात 2162 श्रीसदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.