बंद कॅमेरांमुळे शहरात गुन्हेगारी फोफावली
| तळा | प्रतिनिधी |
तळा शहरातील बंद सीसीटीव्ही कॅमेरांमुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होणार तरी कधी असा प्रश्न आता शहरवासियांकडून उपस्थित केला जात आहे.
तळा शहरात महिला व मुलींची छेडछाड, चेन स्नॅचिंग, पाकीट मार, चोरी यांसारख्या गुन्हेगारीला आळा बसावा तसेच अशा प्रकारच्या घटना घडल्यास गुन्हेगार शोधण्यास पोलिसांना सोपे व्हावे यासाठी 15 ऑगस्ट 2021 रोजी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. हे कॅमेरे शहरातील मल्हार हॉटेल जवळील प्रवेशद्वारावर, मिनिडोअर स्टँड व नगरपंचायत नाका, बळीचा नाका व बँक ऑफ इंडिया समोर, मुळे नाका व महाविद्यालय रस्ता, तसेच चंडिका नाका या ठिकाणी प्रत्येकी दोन असे एकूण दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. हे कॅमेरे सुरू असताना शहरातील गुन्हेगारीत घट झाली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून हे कॅमेरे बंद अवस्थेत असल्यामुळे शहरात गुन्हेगारी वाढली असून काही दिवसांपूर्वीच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. मात्र, सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने यातील आरोपींना शोधण्यास पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती. यामुळे शहरातील नागरिक व महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने शहरातील बंद अवस्थेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.