स्वच्छतेवर होणारा खर्च फक्त कागदावरच; प्रवाशांसह कर्मचार्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
। अलिबाग । प्रतिनिधी ।
एसटी महामंडळ रायगड विभागाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर रामवाडी बस स्थानक आहे. या स्थानकाच्या आवारात कचर्या ढिगारा साचला आहे. महामंडळाकडून कंत्राटी व रोजंदारीवर कामगार घेऊन स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च केले जातात. तरीदेखील स्थानकातील आवारामधील कचर्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसल्याने कर्मचारी व प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
रामवाडी एसटी बस स्थानक अलिबाग – पेण मार्गावर मध्यवर्ती ठिकाणी आहे. या स्थानकामधून लांब पल्ल्यांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात सुटतात. चिपळूण, रत्नागिरी, खेडसह मुंबई, ठाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी गाड्या याच स्थानकातून ये जा करतात. त्यामुळे कोकणात जाणार्या प्रवाशांसाठी हे स्थानक फायदेशीर ठरत आहे. हे स्थानक वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाणार्या प्रवाशांची गर्दी या स्थानकात कायमच राहिली आहे. परंतू या स्थानकाच्या आवारातच कचर्याचा ढिगारा असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून हा कचरा स्वच्छतागृहाच्या बाजूला पडून आले. त्याची विल्हेवाट लावण्यास संबधित विभाग उदासीन असल्याचे चित्र समोर आले आहे. स्थानक स्वच्छ राहवे, यासाठी एसटी महामंडळ विभागाने नियमीत कर्मचार्यांना इतर कामे सोपवून त्याठिकाणी रोजंदारीवर व कंत्राटी कामगार म्हणून नियुक्त केले. जिल्ह्यातील प्रत्येक एसटी बस आगारातील व स्थानकातील स्वच्छता राखण्यासाठी कामगारांची नियुक्ती करण्यात आली. 300 ते 400 रुपये रोजंदारीवर कर्मचारी घेण्यात आले. प्रत्येक आगारात सुमारे तीन कर्मचारी असतात. महिन्याला दहा हजार ते 12 हजार रुपये देऊन त्यांच्याकडून स्वच्छता करून घेतली जाते. स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च करूनदेखील कचर्याची विल्हेवाट लावण्यास एसटी महामंडळ उदासीन असल्याचे यावरून दिसून येत आहे. विभाग नियंत्रक दिपक घोडे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
रामवाडी येथील स्थानकातील कचरा काढण्याचे काम करण्यात आले आहे. हा कचरा गोळा करून नगरपालिकेमार्फत त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. त्याबाबत नगरपालिकेला कळविण्यात आले आहे.
दिपक घोडे
विभाग नियंत्रक, रायगड