भारतीय सैन्य दलाचे चोख प्रत्युत्तर; दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर या मिशन अंतर्गत दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले असून या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्लात जवळपास 25 हिंदू शहीद झाले. त्यानंतर आता 15 दिवसानंतर भारताने पाकिस्तानला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. भारताने दहशतवाद्यांना लक्ष्य करत हल्ला केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या या एअरस्ट्राइकमध्ये कुख्यात दहशतवादी मसूर अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा झाला. इतरही अनेक दहशतवादी या एअर स्ट्राइकमध्ये मारले गेले आहेत. यात मसुद अजहरचा भाऊ रऊफ अजगर हा गंभीर जखमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.