अलिबाग-बेलकडे मार्गावर धुळीचा धुरळा!

खड्डे बुजविण्याच्या नावाखाली खडीचा थर; दुचाकी घसरून अपघातांचा धोका, धुळीने नागरिक हैराण

| चौल | प्रतिनिधी |

अलिबाग-रेवदंडा मुख्य मार्गावरील कुरुळ ते बेलकडे दरम्यान गणेशोत्सवाच्या तोंडावर खड्डे बुजविण्याच्या नावाखाली रस्त्यावर टाकलेली खडी आता सर्वत्र पसरल्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यातच वाहनांच्या वेगाने उडणाऱ्या धुळीने प्रवाशांना अक्षरशः नाक-तोंड झाकून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाला असतानाही संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.

अलिबाग ते मुरुड रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम एमएसआयडीसीच्या माध्यमातून सुरू आहे. या कामामुळे आधीच अनेक ठिकाणी वाहतूक, धूळ आणि खड्ड्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यात कुरुळ ते बेलकडेदरम्यान पडलेले मोठमोठे खड्डे गणेशोत्सवापूर्वी घाईघाईने साधी खडी टाकून बुजविण्यात आले. मात्र, खडी व्यवस्थित दाबून अथवा रस्त्याच्या पृष्ठभागाशी समतल करून काम पूर्ण करण्याऐवजी थातुरमातुर मलमपट्टी करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

खड्ड्यांमध्ये टाकलेली खडी आता बाहेर येऊन रस्त्यावर पसरली आहे. वाहनांची वर्दळ वाढली की ही खडी चाकांखालून उडत आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी खडीचा अंदाज न आल्याने धोका आणखी वाढतो. रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली नागरिकांसाठी नवा धोका निर्माण झाल्याने संताप व्यक्त होत आहे. रस्त्यावर पसरलेली खडी वाहनांच्या टायरखाली येताच मोठ्या प्रमाणात धुरळा उडत आहे. या धुळीमुळे वाहनचालक, पादचारी, स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांना नाक-तोंड झाकून प्रवास करावा लागत आहे. सतत धुळीच्या संपर्कात राहिल्याने श्वसनासंबंधी त्रास होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, कुरुळ ते बेलकडे दरम्यान पसरलेली खडी तातडीने हटवावी, रस्त्याची योग्य पद्धतीने डागडुजी करावी आणि धुळीवर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

सहा महिन्यांत रस्ते उधळले?
एमएसआयडीसीच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या दर्जावरही नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या काही रस्त्यांची अवस्था काही महिन्यांतच खराब झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे वारंवार दुरुस्तीची वेळ का येते, कामाचा दर्जा तपासला जातो का, तसेच सार्वजनिक पैशातून होणाऱ्या कामाची जबाबदारी कोण घेणार, असे सवाल उपस्थित होत आहेत.
टायरखालून उडणारी खडी धोकादायक
रस्त्यावर पसरलेली खडी केवळ दुचाकी घसरण्यापुरती मर्यादित नाही. वाहनांच्या टायरखालून वेगाने उडणारी खडी दुचाकीस्वार, सायकलस्वार किंवा पादचाऱ्याच्या डोळ्याला लागल्यास गंभीर दुखापत होऊ शकते. डोळ्याला कायमस्वरूपी इजा होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्यावर खडी टाकून ती तशीच सोडणे हा केवळ निकृष्ट कामाचा प्रश्न नसून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून खडी हटवणे आणि रस्ता सुरक्षित करणे आवश्यक आहे.

खड्ड्यातील बाहेर आलेली खडी अपघातास कारणीभूत ठरत आहे. त्यातच उडणाऱ्या धुळीचा त्रास प्रचंड आहे. नागरिकांना नाक-तोंड झाकून प्रवास करावा लागत आहे. धुळीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून खडी हटवावी आणि धुळीवर उपाययोजना करावी. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

रुपेश पाटील,
ग्रामस्थ, बेलकडे
Exit mobile version