‌‘क्लस्टर‌’ ठरणार ‌‘आयडॉल‌’

हमरापूर येथे गणेश मूर्तीकार व्यवसाय कंपनीची स्थापना

| रायगड | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील हमरापूर येथील गणेशमूर्ती व्यवसायाला समूह विकासाची जोड मिळणार आहे. केंद्र सरकार आणि राज्यसरकारच्या मदतीने याबाबतचा हा उपक्रम राबविला जाणार असून, यासाठी श्री मोरया गणपती आयडॉल फाऊंडेशन या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी साडेचार कोटीचा प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या सुक्ष्म आणि लघु समूह विकास र्कायक्रमांर्तगत हमरापूर येथील गणेश मूर्ती व्यवसायिकांसाठी समूह विकास योजना राबविण्यात येणार आहे. या व्यवसायाचे विस्कळीत स्वरूप दूर करून त्याचा एकत्रिक विकास करणे हा यामागचा उद्देश आहे. यासाठी हमरापूर जोहे परिसरातील साडे तीनशेहून अधिक गणेश मूर्तीकार व्यवसायिक एकत्र आले आहेत. त्यांनी एकत्र येऊन कंपनीची स्थापना केली आहे. याच परिसरातील जागा भाडेतत्वावर घेऊन या ठिकाणी प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. जागा निश्चितीही झाली आहे. प्रकल्प आराखडा देखील तयार करण्यात आला असून, तो मंजूरीसाठी पाठवण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी लागणाऱ्या कच्चा मालासाठी व्यवसायिकांना परराज्यांवर अवलंबून रहावे लागते ही समस्या लक्षात घेऊन आता हमरापूर येथे कच्चा माल साठवण केंद्रांची उभारणी केली जाईल, त्याचबरोबर मूर्तिकारांना प्रशिक्षण देण्यासाठी एका प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली जाईल, सामुहीक प्रोसेसिंग युनिटची निर्मिती करून त्यात, इंजेक्शन मोल्डींग आणि फ्लोरोसंट कलरींग मशिन्सची परदेशातून बनवून या ठिकाणी बसवून घेतल्या जातील.

यांत्रिकीकरणामुळे व्यवसायाच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे. गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे. वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी कंपनीमधील भागीदारांनी 10 टक्के निधी उभारचा आहे. तर उर्वरीत 90 टक्के निधी केंद्र आणि राज्य सरकार देणार आहे. पेण तालुक्यातील जोहे, हमरापुर परिसरात गणेशमूर्ती बनवणाऱ्या 350 हून अधिक कार्यशाळा आहेत. यातून दरवर्षी जवळपास 20लाख गणेशमूर्त्या तयार केल्या जातात. ज्या देशा विदेशात पाठवल्या जातात. या मुर्तीकला व्यवसायातून दरवर्षी साधारणपणे 50 कोटींची उलाढाल होत असते. समुह विकास प्रकल्पामुळे या व्यवसायाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्हा रोजगार निर्मिती कार्यालयाच्या वतीने क्लस्टर डेव्हलपिंग प्रोग्राम राबवला जात असल्याने या कार्यालयाच्या माध्यमातून कारागीर उद्योगवृद्धीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पूर्वी नोंदणीकृत नसलेल्या कारखान्यांचीही नोंदणी होऊ लागली आहे. यातील 90 टक्के कारखानदारांनी उद्यम रजिस्ट्रेशन केले आहे. पैशांची देवाणघेवाण ऑनलाईन होत असल्याने काही वर्षांपूर्वी असंघटीत असलेल्या या कारखानदारांचे बँकांमध्ये व्यावसायिक खाती आहेत. मूर्ती कारागिरांच्या वेगवेगळ्या गावांत संघटना आहेत, या संघटनांचीही जिल्हा धर्मादाय कार्यालयात नोंदणी झाली आहे.

पेण तालुक्यातील मूर्तिकारागिरांसाठी चार ते साडेचार कोटी रुपये खर्चून क्लस्टर डेव्हलपिंग प्लॅन आखला जात आहे. जे कारागीर मोठ्या किमतीची यंत्रे विकत घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी सामूहिक सुविधा केंद्र सुरू केली जाणार आहेत. हमरापूर गावात अशाप्रकारचे सुविधा केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यातून गावातील लहान कारागिरांच्या उद्योगवाढीसाठी मदत होईल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून कारागिरांना चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. त्याचा पाठपुरावा सातत्याने घेण्यात येत असल्याने दहा वर्षांत या उद्योगाने भरारी घेतल्याचे दिसून येत आहे.

गुरुशांतप्पा हरळय्या,
महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र.
Exit mobile version