। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
भातपीकाच्या खालोखाल मुरुड तालुक्यातील शेकडो बागायतदार शेतकऱी नारळ सुपारी पिकाचे उत्पन्न घेतात. मुरुड तालुक्यातील 74 गावे व 24 ग्रामपंचायतींचे एकूण भौगोलिक क्षेत्र 26 हजार 525 हेक्टर असून यातील सुपारी 416 तर नारळाचे पीक 435 हेक्टरवर घेतले जाते. निसर्ग वादळात यापैकी 77.47 हेक्टर नारळ पिकाखालील क्षेत्र बाधीत झाले होते. हा मोठा फटका नारळ उत्पादक बागायतदार शेतकर्यांना बसला होता. या घटनेला चार वर्षांचा काळ लोटला असला तरी बागायतदार अजून त्या आर्थिक धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. यातच नारळाच्या झाडांवर व फळांवर पडत असलेल्या विविध रोगांमुळे हे पीक संकटात सापडले आहे.
सध्याच्या घडीला येथील बागायतीतील नारळाच्या झाडांवर पांढर्या अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. सुरवंटाच्या जातीच्या या आळ्या झापांची पाने गुंडाळून पानांचा फडशा पाडता आहेत. तर, पांढर्या माशीच्या प्रादुर्भावामुळे उभे नारळाचे झाड सुकून जाऊन बागायतदारांचे मोठे नुकसान करीत आहेत. या खेरीज नारळाच्या झाडांच्या शेंड्यात घुसून पोखरणार्या भुंग्यांमुळे येथील बागायतदार अक्षरशः त्रस्त झाला आहे. ऐन उत्पन्न देणार्या माडाचा शेंडा कुरतडून खाऊन फस्त करणारे भुंगे उभे झाड मारून टाकत आहेत. अशा या विविध रोगांना वेळीच आवर घालण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे या बागायतदारांकडून बोलले जात आहे.






