। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे. आज सोमवार दि.15 सायंकाळी चार वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे ही पत्रकार परिषद होईल. महानगरपालिका निवडणुका संदर्भात निवडणूक आयोगाकडून आज घोषणा होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. रविवारी (दि. 14) राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं. त्यानंतर आज राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली आहे. त्यामुळे महानगपालिकेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्यात आजपासूनच आचारसंहिता लागणार की काय?, हे राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतरच समोर येईल. राज्यातील एकूण 29 महापालिका निवडणुकांसाठी प्रलंबित आहेत. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला मुदतवाढ दिली होती. त्यानुसार आता राज्य सरकारला 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरु केली होती.







